बांदा- दाणोली मार्गावरील दाभिल पूल पाण्याखाली
ओटवणे / प्रतिनिधी–
रविवारी पहाटेपासून सह्याद्री पट्ट्यात पावसाच्या संततधारेमुळे दाभिल नदीला पूर आल्यामुळे बांदा – दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे पुल रविवारी सकाळपासून पाण्याखाली आहे. त्यामुळे या जिल्हा मार्गवरील वाहतूक ठप्प झाली असुन याचा फटका वर्षा पर्यटनासाठी आंबोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांसह वाहन चालकांना बसला.
वाहतुकीच्या दृष्टीने बांदा – दाणोली हा जिल्हा मार्ग महत्त्वाचा आहे. आंबोली आणि गोवा ही दोन्ही पर्यटन स्थळे कमी अंतरात जोडणारा हा मार्ग असून पावसाळ्यात या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच बांदा परिसरातून पुणे, कोल्हापूरसह बेळगाव येथे येण्या-जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे प्रवासासाठी या भागातील बहुतांशी वाहन चालक याच मार्गाचा अवलंब करतात.
मात्र, या कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात या पुलावर सातत्याने पाणी येऊन या जिल्हामार्गावरील वाहतुक ठप्प होते. दरम्यान या ठिकाणी नवीन पुलासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा निधी मंजूर असून येत्या नोव्हेंबर महिन्यात या पुलाच्या कामास शुभारंभ होणार आहे.