केएसएकडील वरिष्ठ संघांकडून खेळाडूंच्या चाचपणीला सुरुवात, दरमहा राष्ट्रीयफुटबॉलपटूंना 30 ते 45 हजार तर परदेशींना 50 ते 70 हजार रुपये देण्याची तयारी,स्थानिक खेळाडूंची हंगामासाठी लाखांहून अधिक रुपयांवर मागणी
संग्राम काटकर / कोल्हापूर
नोव्हेंबर महिन्यात कोणत्याही क्षणी छत्रपती शाहू स्टेडियममध्ये नव्या कोल्हापूरी फुटबॉल हंगामाचा किकऑप होण्याचे संकेत आहेत. याचा अंदाज घेऊन आत्तापासून केएसएच्या सुपर-एट रँकिंगमध्ये असलेल्या वरिष्ठ संघ व्यवस्थापन व्यावसासिकतेच्या धर्तीवर संघ बांधणीसाठी खेळाडूंशी संपर्क साधत आहे. कोरोनामुळे गतहंगामात परदेशी, राष्ट्रीय खेळाडूंना संघात स्थान दिले नव्हते. येत्या हंगामासाठी मात्र कोणतेही निर्बंध नसल्याने परदेशी खेळाडूंना संघात स्थान दिले जाणार आहे. सहाजिकच संघांनी 2 परदेशी व 1 राष्ट्रीय खेळाडूला संघा स्थान देण्याचे आत्ताच पक्के केले आहे. तसेच पदरेशी, राष्ट्रीयसह स्थानिक खेळाडूंचा मिळवून संघ बांधण्यासाठी 1 कोटी रुपयांची तजवीज ही केली आहे. यापैकी परदेशी खेळाडूंना दरमहा 50 ते 70 हजार व राष्ट्रीय खेळाडूंना 30 ते 45 हजार रुपये दिले जाणार आहेत.
कोरोनामुळे दोन वर्षे आर्थिक फटका बसलेल्या स्थानिक स्टार खेळाडूंनीही आपला भाव चांगला वधारला आहे. हे खेळाडू संपूर्ण हंगामासाठी 1 लाखांहून अधिक रुपयांची संघांकडे मागणी करताहेत. या सगळ्या पैशाच्या खेळात जो संघ जादा पैसे सोडेल, त्याचे पारडे जड दिसणार हे मात्र निश्चित. आता दसऱयानंतर केएसएकडून संघ नोंदणी कार्यक्रम जाहीर होताच खऱया अर्थाने संघ बांधणीसह फुटबॉल फिव्हरला सुरुवात होईल. कोरोनाच्या कटू अनुभवामुळे 2019 व 2020 साली बंद ठेवलेल्या फुटबॉल हंगामाचा गतवर्षी फ्रेबुवारीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने किकऑफ केला खरा. पण संसर्ग रोखण्यासाठी परदेशी व राष्ट्रीय खेळाडूंना संघात स्थान देण्यास मनाई केली. त्यामुळे संपूर्ण हंगामात स्थानिक खेळाडूचीच संघांना मोट बांधावी लागली. पण या खेळाडूंची कोरोनामुळे सरावाची घडी मोडल्याने स्टेडियमच्या हिरवळीवर दमछाक झाली. शिवाजी तरुण मंडळाने मात्र डंका पिटत केएसए लीग चॅम्पियनशीपसह स्पर्धा विजेतेपदाचा चौकार मारुन हंगामावर वर्चस्व मिळवले. दिलबहार तालीमनेही केएम चषक जिंकून आब राखला.
जुनमध्ये केएसएने फुटबॉल हंगाम संपल्याची घोषणा केल्यानंतर मात्र सर्वच वरिष्ठ संघांनी पुढील वर्षीच्या हंगामात ताकदवर संघ तयार करण्याचे पक्के केले. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही निर्बंध नसल्याने केएसएने गेल्याच महिन्यात राष्ट्रीय, परदेशी व राज्यस्तरीय खेळाडू संघात स्थान देण्यात पुन्हा अनुमती दिली आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने संघ बांधणीसाठी लाखो रुपयांची तजवीज करुन ठेवली आहे. गेल्या महिन्याभरात सारे कोल्हापूरकर गणेशोत्सवात मग्न असतानाच संघ व्यवस्थापन मात्र 2 परदेशी, 1 राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय व स्थानिक स्टार खेळाडूंच्या जुळणीला लागले होते. सध्या कोणता खेळाडू आपल्या संघात घ्यायचा हे खेळाडूंकडील स्कील पाहून निश्चित केले जात आहेत. सोबत खेळाडू व संघ व्यवस्थापन यांच्यात मानधनावरुन लाखाची बातसुद्धा होत आहे. संघ व्यवस्थापन आपल्याकडील पैशाचा विचार करुन खेळाडूंशी बारगेनिंगही करत आहे. आज ना उद्या संघ बांधणीबाबतचा पैशाचा खेळ पूर्ण होऊन नव्या हंगामासाठी मैदानातील प्लेसनुसार संघ तयार केला जाईल. जसा संघ तयार होत जाईल, तसे ते सरावाला लागून नव्या हंगामासाठी सज्ज होऊ लागतील.
सिनिअर सुपर-एटमधील संघांनी संघ बांधणीसाठी केलेली आर्थिक तजवीज अशी
शिवाजी तरुण मंडळ-12 ते 15 लाख रुपये.
दिलबहार तालीम मंडळ- 10 ते 12 लाख.
पाटाकडील तालीम मंडळ 10 लाख.
प्रॅक्टीस फुटबॉल क्लब-14 लाख.
बालगोपाल तालीम मंडळ-13 लाख.
खंडोबा तालीम मंडळ-10 लाख.
संयुक्त जुना बुधवार पेठ-6 ते 8 लाख.
बीजीएम स्पोर्टस्-5 ते 7 लाख.
फुलेवाडीला पुन्हा सिनिअर सुपर-एटमध्ये आणणार…
गतवर्षीच्या फुटबॉल हंगामात खराब कामगिरीमुळे तुल्यबळ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाला केएसएच्या सिनिअर सुपर-एटमधून सिनिअर-एटमधील संघाच्या गटात जावे लागले. येत्या नव्या हंगामात मात्र संघाला पुन्हा फॉर्मात आणून पुन्हा सिनिअर सुपर-एटमध्येच्या दृष्टीने संघ बांधणी केली जाईल. त्यासाठी संघाची दोन परदेशी, एक राष्ट्रीय व स्थानिक खेळाडू अशी मोट बांधली जाईल. संघ बांधणीसाठी आम्ही 12 ते 15 लाख रुपये अपेक्षित धरले आहेत.
राहूल माने (अध्यक्ष : फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ)