वाकरे प्रतिनिधी
कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावर वाकरे फाटा येथील डॉ. विठ्ठल पाटील यांच्या दवाखान्यासमोर शुक्रवारी सकाळी शेताला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला रस्त्यावरून शेताकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात टेम्पोने धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
शंकर हरी पाटील (वय ७०) रा. साबळेवाडी असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. ते श्रीकृष्ण दूध संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत शंकर पाटील यांची दोनवडे फाटा ते वाकरे फाटा या मार्गावर शेती आहे. दोनवडे पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या विहिरीवरील विद्युत मोटर सुरू करून वाकरे फाटा येथील शेतामध्ये ते पाणी देण्यासाठी गेले होते. दररोज सकाळी ते या परिसरात शेताकडे जात होते. शुक्रवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास शेतातील पाणी पाहण्यासाठी जात असताना वाकरे फाटा येथे डॉ.विठ्ठल पाटील यांच्या दवाखान्यासमोर रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने जात असताना कुडीत्रेकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अज्ञात टेम्पोने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन रस्त्याकडेला पडले. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी त्यांना त्वरित समोर असणाऱ्या डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.डॉ. पाटील यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले.मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करून दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाला असून पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने डाव्या बाजूने जाणाऱ्या शंकर पाटील यांना पाठीमागून धडक दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, मात्र या टेम्पोचा नंबर मिळू शकलेला नाही.या टेम्पोचा पोलिसांनी शोध घेण्याची मागणी होत आहे.