आचरा प्रतिनिधी
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या व संस्थानी थाटासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आचरा येथील इनामदार देव रामेश्वर संस्थानच्या दसरोत्सवाची सायंकाळी शाही थाटात सांगता झाली. सायंकाळी तोफाच्या व बंदुकीच्या आतषबाजीनंतर देव रामेश्वराचे तरंगासह महालदार, चोपदार अब्दागीर, निशाण व बारा- पाच मानकरी शाही लवाजम्यासह पुरसाई मंदिर येथे शिवलग्न सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते. शिवलग्न सोहळा पार पडल्यानंतर हजारो भाविकांनी सोन्याचे प्रतीक मानलेल्या आपट्याची पाने सोने म्हणून वाटली.
आचरा गावच्या माहेरवाशिणी फुरसाई देवीची खणा-नारळाने ओटी भरण्यास दाखल झाल्या होत्या. सकाळपासून देव रामेश्वराचे दर्शन घेऊन माहेरवाशिणी देवी फुरसाई मंदिराकडे ओट्या भरण्यासाठी जात होत्या. इनामदार देव रामेश्वर संस्थानच्या दसरोत्सवात मुंबई, कराड, गोवा, बेळगाव, पुणे, कोल्हापूर येथून आचरा गावचे मूळ रहिवासी दाखल झाले होते देव रामेश्वराची पिंडी यावेळी पंचमुखी महादेवाच्या रुपात सजविण्यात आली होती. श्रीचे पंचमुखी स्वरूपातील रूप पाहण्याचा दुर्मिळ आनंद लुटण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.