कंग्राळी बुद्रुक परिसरातील भाविकांचे साकडे : सवाद्य मिरवणुकीने बाप्पांचे स्वागत
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मंगळवारी कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड, यमनापूर परिसरामध्ये सकाळपासूनच घरगुती गणपती मूर्ती आणत असल्याचे चित्र दिसून येत होते. यावर्षी गेले दोन महिने पावसाने दडी मारल्याने गणपती सणाला तरी पावसाला सुरुवात व्हावी अशी गणरायाकडे मागणी गणेशभक्त करत होते. गणराया आता तूच तार अशी मागणी गणपतीची पूजा करताना भक्त करत असल्याचे दिसून आले.
पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीने स्वागत
यावर्षी परिसरात पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीने घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती आणण्यात आल्या. कंग्राळी बुद्रुक व कंग्राळी खुर्द किर्यात परिसरामध्ये 50 ते 60 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असल्याचा अंदाज असून रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे पूजन झाल्याचे दिसून येत होते.
गणरायाकडे पावसासाठी साकडे
मागील एक महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. जर पाऊस असाच लांबला तर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. म्हणून कंग्राळी बुद्रुक किर्यात परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूजेवेळी पावसासाठी साकडे घातले.