काही अज्ञात व्यक्तींनी मंबईत वतीनं वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली आहे. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास परिसरात उभ्या असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान करण्यात आले. य़ा हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना ज्या कोणी लोकांनी हे कृत्य केले आहे त्यांना पोलीसांनी सोडून द्यावे असे आवाहन केले आहे.
मराठा आंदोलनाच्या तिव्रता वाढत असताना अनेक राजकिय नेत्यांना तसेच शासकिय अधिकाऱ्यांना लक्ष केले जात आहे. राजकिय अधिकाऱ्यांना गावबंदी करून त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा मराठा आंदोलकांकडून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात मराठा आंदोलन तीव्र होत असताना राजकिय नेत्य़ांच्या गाड्या फोडल्या जात आहेत. आज सकाळी मुंबईतील आकाशवाणी परिसरातील आमदार निवासाजवळ उभी असणारी हसन मुश्रीफ यांची गाडी काही युवकांनी फोडल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. पोलीसांनी तात्काळ फोडाफोडी करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले आहे.
त्यानंतर माध्यमांबरोबर संवाद साधताना हसन मुश्रीफ म्हणाले, “मी सुरक्षित असून ज्या तरूणांनी माझ्या गाडीची तोडफोड केली, त्या तरुणांना सोडून द्यावं. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नये, अशी माझी पोलीसांना विनंती आहे. मराठा समाज हा आमचाच समाज असून आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत. मंत्र्यांची घरं जाळण्याचे प्रकार हे अत्यंत गंभीर आहेत. अशा घटनांमुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे.” असंही हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली.
या घटनेनंतर मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात मोठा पोलीस फौटफाटा तैनात केला आहे. तसेच मंत्रालयात येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करूनच त्यांना कामानिमित्त आत सोडलं जात आहे. हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेरही पोलीस बंदोबस्तात वाढ करून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या बरोबरच राज्यातील मंत्र्यांच्या तसेच नेत्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.