वृत्तसंस्था / इस्लामाबाद
अनेक भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये कारागृहात असलेला पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रानखान याच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाने नव्या अध्यक्षांची निवड केली आहे. गोहर अली खान हे या पक्षाचे नवे अध्यक्ष आहेत. पाकिस्तानच्या मुख्य निवडणूक आयोगाने इम्रानखानच्या पक्षाला नवा अध्यक्ष त्वरित निवडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आता ही निवड करण्यात आली आहे.
इम्रानखान याने आपल्या पक्षाची स्थापना 1996 मध्ये केली. त्यानंतर या पक्षाचे अध्यक्षपदही सातत्याने त्याने स्वत:कडेच राखले. पक्षाच्या स्थापनेनंतर तब्बल 27 वर्षांनी या पक्षाला इम्रानखान सोडून अन्य अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रीय असेंब्लीची आगामी निवडणूक आपला पक्ष प्राणपणाने लढविणार आहे, असे गोहर अली खान यांनी त्यांची निवड झाल्यानंतर पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे.