वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशनची एनएमसीला मान्यता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला (एनएमसी) वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन (डब्ल्यूएफएमई)ने 10 वर्षांसाठी मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे भारतीय वैद्यकीय पदवीधर आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडात प्रॅक्टिस करू शकणार आहेत. तसेच भारतीय वैद्यकीय पदवीधरांना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यासारख्या अन्य देशांमध्ये मास्टर्स ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस करण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे. या मान्यतेच्या अंतर्गत देशातील सर्व 706 वैद्यकीय महाविद्यालये डब्ल्यूएफएमई मान्यताप्राप्त झाली आहेत. तसेच आगामी 10 वर्षांमध्ये स्थापन होणारी नवी वैद्यकीय महाविद्यालये आपोआप डब्ल्यूएफएमई मान्यताप्राप्त ठरणार आहेत. डब्ल्यूएफएमईची मान्यता मिळाल्याने भारतात शिक्षण घेण्याची संधी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याचबरोबर एनएमसीला जगात सर्वश्रेष्ठ गुणवत्तेसोबत जोडून घेत भारतातील वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता अन् मापदंड वाढविण्याचा विशेषाधिकार प्राप्त होणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रतिष्ठेत भर
डब्ल्यूएफएमईच्या मान्यतेमुळे भारतीय वैद्यकीय महाविद्यालये आणि व्यावसायिकांची आंतरराष्ट्रीय मान्यता आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. महाविद्यालयांना अकॅडमिक सहकार्य आणि आदान-प्रदानाची सुविधा मिळणार आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणात निरंतर सुधारणा आणि नवोन्मेषाला चालना मिळणार आहे. वैद्यकीय शिक्षक आणि संस्थांदरम्यान गुणवत्ता आश्वासनाच्या संस्कृतीला चालना मिळणार आहे.
वर्ल्ड फेडरेशनचे कार्यस्वरुप
वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन एक जागतिक संघटना असून ती जगभरात वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी काम करते. सर्व मानवजातीसाठी उत्तम आरोग्य देखभालीसाठी प्रयत्न करणे हे डब्ल्यूएफएमईचे उद्दिष्ट आहे. वैद्यकीय शिक्षणात उच्च वैज्ञानिक अन् नैतिक मापदंडांना बळ देत जगभरात वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील आहे.