होली स्प्रे, कॅप्सुल, फ्लोरोसंट, टँक पिचकारी, फॅन्सी गन, अॅटोमेटीक एअर गनचे आकर्षण; बालचमूंची खरेदीसाठी लगबग : नैसर्गिक हर्बल रंगांना मागणी; दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ; पोलासांची हुल्लडबाजांवर करडी नजर
इम्रान गवंडी कोल्हापूर
रंगात न्हाऊन अबालवृद्धांचा आनंद द्विगुणित करणारा सण म्हणजे रंगपंचमी.. हा रंगोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांसह बालचमूंची विविध प्रकारचे रंग, फुगे, पिचकारी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. प्रामुख्याने नैसर्गिक हर्बल रंगांना मागणी आहे. विविध रंग व पिचकाऱ्यांनी बाजरपेठा सजल्या आहेत. कच्चा मालाचा दरात वाढ झाल्यामुळे सर्वच रंगांच्या किंमती वाढल्या असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
यंदा बाजारात मॅजिक ‘कलर ग्लास’चे नाविन्य आहे. या ग्लासमध्ये पाणी ओतताच आपोआप रंग तयार होतो. शहरातील होलसेल बाजारपेठांमध्ये रंग, फुगे, पिचकाऱ्यांच्या हजारो व्हरायटी दाखल झाल्या आहेत. अॅटोमेटीक रंग उडणारी एअर गन, आवाज करणारी पुंगी पिचकारी, टँक पिचकारी, टू इंन वन कलर डबी, होली स्प्रे, कॅप्सुल, फ्लोरोसंटचे बालचमूंना आकर्षण आहे. पिचकारी व पाण्यात टाकण्यासाठी सुवासिक परफ्युम लिक्विड रंगही बाजारात उपलब्ध आहेत.
शहरातील महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, बाजारगेट, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी आदी प्रमुख ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा रंगांच्या साहित्याचे स्टॉल लागले आहेत. पिचकारीमध्ये छोटा भिम, मोटू पतलु, डोरेमॉन, शाकालाका, मँगोपाईप, मासा, कोंबडा, डायनॉसोर, मंकी अशा विविधप्रकारच्या पिचकाऱ्यांकडे कल आहे. टॉपगन, पाठीवर अडकवण्याचे वॉटर टैंक, मिनी थंडर व थंडर अशा दोन प्रकारच्या स्प्रेला ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी आहे. औरंगाबाद, हाथरस, गुजरात, मुंबई, सोलापुर येथून मोठ्याप्रमाणत आवक झाली आहे. पिवडी व रंगीत पिवडीला तरूणाईकडून मागणी अधिक आहे.
नैसर्गिक हर्बल रंगांना मागणी
केमिकल, रासायनिक रंगामुळे त्वचेला इजा पोहचू शकते. डोळ्यांना यांची इजा होऊ शकते. विशेषत: लहान मुलांना याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नागकांकडून नैसर्गिक हर्बल रंगांना मागणी आहे.
बाजारातील दर असे
नाविन्यपूर्ण मॅजिक कलर ग्लास – 20 रू. नग, हरबल नैसर्गिक रंग – 100 रू. किलो, सील्वर-गोल्डन पेस्ट- 20 रू. 100 ग्रॅम, पाण्यातील रंग – 100 ते 120 रू. किलो, होली स्प्रे – 20 ते 30 रू., वॉटर टँक गन – 100 ते 500 रु., फॅन्सी पंप – 50 ते 200 रू., फॅन्सी गन – 10 ते 600 रू., अॅटोमेटीक एअर गन – 600 रू., पुंगी गन – 40 ते 200 रू., दिल्ली पंप – 10 ते 50 रू., वांगी फुगा – 20 रू. पाकीट, काकडी फुगा – 40 रू. 80 नग, जंबो फुगा – 90 रू. पाकीट, हर्बल खडी, गुलाल पाकीट – 10 ते 50 रू. पाकीट, 12 रंगाचे लहान पाकीट 65 रु., कॅप्सुल रंग : 25 रु. पाकीट.
हुल्लडबाजांवर कडक कारवाई
रंगपंचमीच्या पार्श्वभुमीवर शहरातील प्रत्येक चौकात पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मद्यपी, दुचाकीवर तीब्बल सीट फिरणारे, महिला व तरूणींची छेड काढणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी शांततेत रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन शहर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण यांनी केले आहे.
दरामध्ये 15 टक्यांनी वाढ
कच्चा मालाचे दर वाढल्यामुळे दरात वाढ झालेली आहे. यंदा रंग, पिचकाऱ्या आदी साहित्य खरेदीसाठी बालचमूंसह नागरिकांच्यात उत्साह आहे. रंगपंचमीसाठी लागणाऱ्या साहित्याची मोठी आवक झाली आहे.
अमिर पटवेगार, विक्रेता