ऑनलाईन टीम/तरुण भारत
विनायक दामोदर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज शेगाव येथे राहुल गांधींची सभा होणार आहे. या सभेवेळी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आजचा ७२ वा दिवस असून, महाराष्ट्रातील १२ वा दिवस आहे. तसंच, विदर्भात यात्रेचा चौथा दिवस आहे. आज ही यात्रा बुलडाण्यात प्रवेश करणार आहे. तर, सायंकाळी चार वाजता राहुल गांधी शेगावच्या गजानन महाराजांचे (Gajanan Maharaj in Shegaon) दर्शन घेऊन साडेसहाच्या दरम्यान जाहीर सभा घेणार आहेत. तत्पूर्वी नागपुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना १४९ च्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.
बाळापुरातून आज सकाळी सहा वाजता पदयात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यात्रा शेगावात पोहचल्यानंतर राहुल गांधी गजानन महाराजांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते जाहीर सभा घेतील. त्यासाठी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे देखील आज बाळापुरात पोहचले असून ते देखील कॉंग्रेसच्या शेगावातील सभेला हजेरी लावणार आहेत. याशिवाय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार भाई जगताप, सुनिल केदार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा हे देखील सभेला उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना १४९ च्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी नोटिशीचं उल्लंघन केलं तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नागपूर पोलिसांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा जारी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधता वक्तव्य केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी मनसैनिकांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिलेत. राहुल गांधी यांच्या शेगावातील यात्रेत त्यांचा निषेधकरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी अनेक मनसैनिक शेगावात पोहोचले असून त्यांच्या यात्रेत काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार आहेत.
मनसेकडून शेगावात राहुल गांधींच्या सभेवेळी काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे. याबाबत नाना पटोलेंना विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी आम्हाला काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना फुलं देऊ. मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही, हे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यात्रा कोणीही थांबू शकणार नाही. शेगावच्या सभेसाठी काँग्रेसची मोठी तयारी झाली आहे. मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते पोहोचणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.