खासदार धनंजय महाडिक यांचे सरकारशी चर्चेचे आश्वासन
कोल्हापूर प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी येथील ऐतिहासिक दसरा चौकात अखिल भारत हिंदू महासभेचे कार्यकर्ते राजेंद्र तोरस्कर बेमुदत उपोषणाला बसले होते. खासदार धनंजय महाडिक यांनी राज्य व केंद्र सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासान दिल्यानंतर मंगळवारी दहाव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी तोरस्कार यांनी 1 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणला सुरूवात केली होती. या काळात विविध राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला. मुस्लिम बोर्डिंगनेही आंदोलनासाठी सहकार्य केले. प्रशासनाच्यावतनेही उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती. पण जोपर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार तोरस्कार यांनी केला होता. दहा दिवस सुरू असलेल्या या उपोषणामुळे तोरस्कर यांची तब्येत खालावत चालली होती. सीपीआर वैद्यकीय पथकाकडून दररोज तपासणी केली जात होती.
दरम्यान, मंगळवारी खासदार महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत तोरस्कर यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. मराठा आरक्षणावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारशी लवकरच चर्चा करू, अशी ग्वाही दिली. तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही फोनवरून संपर्क साधत उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. यानंतर खासदार महाडिक यांच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आले.
यावेळी हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, प्रदेश समन्वयक संजय कुलकर्णी, सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडा साळोखे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, प्रदेश महिला अध्यक्ष दीपाली खाडे, बबन हरणे, रेखा दुधाणे, किशोर घाटगे, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, उदय भोसले, सचिन तोडकर, सिद्धार्थ कटाकधोंड, सुहास शिंदे, जितेंद्र पाटील, विक्रम माने, साधना कोठवळे आदी उपस्थित होते.