जीएसटी भरण्यासाठी गतवर्षापासून पाठवली दिल्लीतील व्यक्तीच्या खात्यावर रक्कम
चिपळूण प्रतिनिधी
जी.एस.टी.मध्ये भरणा करण्यासाठी बँक खात्यातून पाठवण्यात आलेली रक्कम न भरता उलट व्हॉटस्ऍपवर बनावट जी.एस.टी. चलन पाठवून 9 लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एकावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारुख अन्सारी (72, दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद जियाउलहक जमील मुल्ला (38, चिपळूण) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जियाउलहक मुल्ला व गुहागर-अंजनवेल येथील त्यांचे मित्र अब्दुल कादीर पांगारकर यांनी फारुख अन्सारी यांच्या नवी दिल्ली येथील आयसीआयसीआय बँकेतील अकाऊंटमध्ये 13 ऑगस्ट 2021 ते 8 जून 2022 या कालावधीत जी.एस.टी. भरण्यासाठी त्यांच्या बँक खात्यातून एकूण 9 लाख 894 रुपये इतके पाठवले होते. मात्र अन्सारी याने ती रक्कम जी.एस.टी.मध्ये भरणा न करता जी.एस.टी. भरणा केल्याचे सांगून त्यांना व्हॉटस्ऍपवर बनावट जी.एस.टी. चलन पाठवून फसवणूक केली. हा प्रकार जियाउलहक मुल्ला यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून त्यानुसार मंगळवारी अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.