साहित्यिक महाबळेश्वर सैल यांचे उद्गार : ‘भूस बरो दिस बरो’चे प्रकाशन
प्रतिनिधी /फातोर्डा
संजय तळवडकर यांचे पुस्तक मन भुलविणारे आहे. यामध्ये गोव्याच्या संदर्भातील सर्व गोष्टी आढळतात. संस्कृतीची लय यामध्ये आहे. शब्दांच्या माध्यमातून मांडलेली कला त्यात आहे. सदर पुस्तक ज्यावेळी गोव्याबाहेरील लोक वाचतील, त्यावेळी त्यांना गोव्याचे दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार सरस्वती पुरस्कारविजेते साहित्यिक महाबळेश्वर सैल यांनी मडगाव रवींद्र भवनच्या परिषदगृहात प्रमुख पाहुणे या नात्याने काढले.
संजना पब्लिकेशनने संजय तळवडकर यांच्या ‘भूस? बरो दिस बरो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे म्हणून उच्च शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक भास्कर नायक, वक्ते म्हणून केपे शासकीय महाविद्यालयातील कोकणी विभाग प्रमुख डॉ. राजय पवार तसेच लेखक तळवडकर उपस्थित होते.
विनोदी लेखन करणे सोपे नव्हे पण लेखकाला ते उत्तमरीत्या जमले आहे. पुस्तकात खूप काही आहे. लेखकाकडे सकारात्मक जीवनशैली आहे. या पुस्तकाचा संदर्भ आपल्या गावातील असल्यामुळे आपल्याला आपले बालपण आठवले, असे भास्कर नायक यांनी सांगितले. भविष्यात लेखकाने सकारात्मक दृष्टिकोनाचा मठ बांधावा, अनुयायी खूप मिळतील, असे ते विनोदाने म्हणाले.
संजना पब्लिकेशनचे दिनेश मणेरकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी केले तर तळवडकर यांनी आभार मानले.