परळी वार्ताहर
किल्ले सज्जनगडावर मंगळवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान गडावरील रामघळ परिसरात काही युवक भटकंती करत होते. यावेळी त्यांना अचानक बिबट्य़ाचे पिल्लू वाटेत खेळताना दिसले. अचानकच दिसलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाच्या दर्शनाने युवकांची भंबेरी उडाली.
ते युवक तसेच चार पावले मागे आले मात्र आजुबाजुला बिबटय़ा नसल्याने त्यांचे धाडस वाढले व बिबटय़ाचे फोटो काढण्यास पुढे सरसावले. काही वेळात हि घटना सज्जनगडावर समजताच युवकांची गर्दी वाढली व त्यातील काहींनी हि घटना तत्काळ वनधिकाऱयांना कळविली मात्र दुपारी 5 वाजेपर्यंत वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. याबाबत तालुका वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सज्जनगडकडे रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले. सज्जगडावर बिबटय़ाचा वावर होता. मात्र हि गोष्ट आता बिबटय़ाचा बछडा पाहिल्याने अधोरेखीत झाली आहे.