संजित रॉड्रिगीस यांच्याकडून समाधान व्यक्त
पणजी : देशातील 100 स्मार्ट शहरांपैकी टॉप 18 शहरांमध्ये पणजीची निवड करण्यात आली आहे. हा गोवा राज्यासाठी आनंदाचा क्षण आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिगीस यांनी दिली. रॉड्रिगीस यांनी सांगितले की, सीआयटीआयआयएस 2.0 चॅलेंजमधील 100 स्मार्ट शहरांपैकी टॉप 18 विजेत्या शहरांमध्ये पणजी स्मार्ट सिटीची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहर व्यवस्थापनमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये सीआयटीआयआयएस 2.0 चॅलेंज लाँच केले आहे. शहरी विकासाला चालना देण्यासाठीचा हा एक राष्ट्रीय उपक्रम असल्याचेही ते म्हणाले. रॉड्रिगीस यांनी सांगितले की, पणजी शहर हे मुळातच देखणे व स्वच्छ आहे. आता स्मार्ट शहरांपैकी टॉप 18 विजेत्या शहरांमध्ये समावेश झाल्याने समाधान व्यक्त करतो. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था व त्याचे नैसर्गिक ओळख जपून ही कामे करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.