एसीबीकडून आमदार राजन साळवी यांच्या घराच्या किंमतीसाठी मोजमाप; आमदार राजन साळवींवर एसबीच्या चौकशीचा ससेमिरा संपता संपेना
रत्नागिरी प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राजापूर-लांजा-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून चौकशीचा सुरू असलेला ससेमिरा अजूनही थांबलेला नाही. शनिवारीही रत्नागिरी शहरातील खालची आळी येथे असलेल्या राहत्या बंगल्याची मूल्यांकन करण्यासाठी मोजमापे घेण्यात आली.
एसीबीने दिलेल्या नोटीसीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराचे मूल्यांकन करण्यासाठी मोजमाप केले. आठवड्यापूर्वीही आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी शहरातील घर व मालमत्तांची मापे घेण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी खालची आळी येथील राहत्या बंगल्याच्या मूल्यांकनासाठी मोजमापे घेण्यात आली. ज्यावेळी ही कारवाई करण्यासाठी बांधकाम विभागाचे कर्मचारी दाखल झाले, त्यावेळी आमदार राजन साळवी हे घरातच देवपूजा करण्यात व्यस्त होते. दरम्यान एसबी चौकशीतील मोजमापे घेण्यासाठी हे कर्मचारी घरी आलेले पाहून साळवी हे अवाक झाले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना कोणताही अडथळा न करता ही कारवाई करण्यास सांगितले.
या बाबत राजन साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मागील 4 महिन्यांपासून एसीबीकडून माझ्या मालमत्तेची चौकशी केली जात आहे. चौकशीत मी माझ्या मालमत्तेची सर्व माहिती त्यांना दिली आहे., तरी त्यांचे समाधान झालेले नाही. सतत मला अलिबागला बोलवले जाते. त्यांना मी माहिती देतो. माझ्या वडीलोपार्जित घराची त्यांनी मोजमाप केली. माझ्या राहत्या घराचीही चौकशी केली. माझ्या राहत्या घरावर मोजमापासाठी टेप लावले, हे पाहून मला खूप दुःख झाले. स्वकष्टाने हे घर मी उभे केले. जुने घर तर वडीलोपार्जित आहे. हॉटेल व्यवसायाच्या उत्पन्नातून 8 वर्षापूर्वी जागा घेऊन मी ते मी घर बांधले. घरावरतीही जनता सहकारी बँकेचे 25 लाखाचं कर्ज आहे. व्यवसायाच्या माध्यमातून जे चार पैसे मिळतात, त्यातून हे घर उभे केले आहे. माझ्या कष्टाच्या घराला आज टेप लावताना पहायला मिळाले, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली.
असा पसंग शत्रूवरही ओढवू नये: साळवी
माझ्यासारख्या सामान्य आमदारावर ओढवलेला प्रसंग म्हणजे ही माझ्यासाठी अत्यंत दु:खद घटना आहे. माझे अश्रू या सरकारला बाधतील. असा प्रसंग शत्रूवरही ओढवू नये. या मुद्यावरून पत्रकारांशी बोलताना साळवी यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांना अश्रू रोखता आले नाहीत.