पिंपरी / प्रतिनिधी :
जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या नऊ मार्चला होत आहे. या पार्श्वभूमीवर देहूतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज गाथा मंदिरात दोन हजार वारकरी गाथा पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे हरिनामाच्या घोषाने देहूनगरी दुमदुमत आहे.
संत तुकाराम महाराज वैकुंठगमन दिवस म्हणजे संत तुकाराम महाराज बीज सोहळा. या सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक बीज सोहळ्याला उपस्थित राहतात. गुरुवारी (दि. ९) बीज सोहळा आहे. संत तुकाराम महाराज देवस्थानच्या वतीने बिजेची जोरदार तयारी सुरू आहे. देऊळवाड्यात मंडप उभारणी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. दुसरीकडे ठिकठिकाणी देहूनगरी बीज सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण सोहळा सुरू झाले आहेत.
राज्याच्या विविध भागातून दिंड्या दाखल झालेल्या आहेत. इंद्रायणी नदीच्या तीरावर राहुट्या तंबू उभारण्यात आले आहेत. गाथा मंदिर येथे संत तुकाराम महाराज वाड्:मय संशोधन मंडळ तथा गाथा मंदिराच्या वतीने १० मार्चपर्यंत गाथा पारायण आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. रविवारी (दि. ५) गोविंद महाराज जाटदेवळेकर यांचे कीर्तन सायंकाळी सहा ते आठ यावेळेत होणार आहे. सोमवारी (दि. ५) स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी दोन वाजता ग्रंथ कंठपाठ बक्षिस वितरण गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. कान्होबा महाराज देहूकर याच्या सायंकाळी कीर्तन होणार आहे. मंगळवारी (दि. ७) ज्ञानेश्वर महाराज शिंदे आणि बुधवारी (दि. ८) चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी (दि. ९) बीज सोहळ्यानिमित्त पांडुरंग महाराज घुले यांचे सकाळी दहा ते बारा यावेळेत कीर्तन होणार आहे. सायंकाळी सहा ते आठ यावेळेत रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन होईल. शुक्रवारी (दि. १०) बंडातात्या कराडकर यांचे सकाळी नऊ ते अकरा यावेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे.