2,808 थडग्यांचाही झाला खुलासा
सौदी अरेबियात एक 8 हजार वर्षे जुन्या पुरातात्विक ठिकाणाचा शोध लागला आहे. अल-फॉ या ठिकाणी हा शोध लागला आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील अनेक देशांच्या पुरातत्व तज्ञांच्या एका पथकाने या ठिकाणाचे व्यापक सर्वेक्षण केले आहे. या अध्ययनात उच्च गुणवत्तेचे हवाई छायाचित्रण, कंट्रोल पॉइंटसह ड्रोन फुटेज, रिमोट सेंसिंग, लेझर सेंसिंग आणि अनेक अन्य सर्वेक्षणपद्धतींचा वापर करण्यात आला.
या ठिकाणावर लागलेल्या शोधांमध्ये सर्वात महत्त्वाचे एक मंदिर आहे. येथे काही हिस्स्यांमध्ये अवशेष आढळून आले आहेत. यातून त्या काळात या ठिकाणी राहत असलेल्या लोकांच्या जीवनात पूजा, समारंभ आणि विधींचे महत्त्व होते असे स्पष्ट होते. या मंदिराचे नाव ‘रॉक-कट’ असून ते माउंट तुवाईकच्या नजीक असून या स्थळाला अल-फॉ या नावाने ओळखले जाते.
नव्या तंत्रज्ञानाद्वारे नवपाषाणकालीन मानवी वसाहतींच्या अवशेषांचा शोध लावण्यास यश मिळाले आहे. याचबरोबर पूर्ण स्थळावर 2,807 थडगी सापडली असून ती विविध कालखंडातील आहेत. या थडग्यांना 6 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. येथे मैदानाला भक्तिशिलालेखांनी सजविण्यात आले होते, जे त्या काळातील अल-फॉच्या लोकांच्या धार्मिक मान्यतांचे स्वरुप स्पष्ट करते. एका शिलालेखात अल-फॉचा एक देवता कहल याचा उल्लेख आहे.
सिंचन प्रणालीचा खुलासा
या स्थळावर सांस्कृतिक संपदेसह एक नियोजित शहराचा खुलासा झाला आहे. याच्या कोपऱयांवर चार टॉवर आहेत. या पुरातात्विक अध्ययनाद्वारे जगातील सर्वात कोरडी भूमी आणि या वाळवंटी वातावरणात कालवे, जलकुंड आणि शेकडो खड्डय़ांसह एका सिंचन प्रणालीचा शोध लागला आहे. अल-फॉ पुरातात्विक क्षेत्र मागील 40 वर्षांपासून अध्ययनाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. या ठिकाणी मंदिर आणि मूर्तीची पूजा करण्याची संस्कृती होती असे यातून समोर आले आहे.