सांगली : आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नियमांचा बडगा उगारल्याने वैद्यकीय अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. मुंडे यांच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा अशी डॉक्टरांची भूमिका आहे. २४ तास मुख्यालयात राहण्याची सक्ती असेल, तर त्यासाठी सोयी-सुविधाही देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, “२४ तास मुख्यालयात राहण्याविषयी शासनाचे आदेश संदीग्ध आहेत. असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. २४ तास सेवेची अपेक्षा असल्यास कामाच्या, विश्रांतीच्या व कौटुंबिक कामकाजांच्या वेळाही निश्चित करुन द्याव्यात.”
आपल्या मागण्या मांडताना वैद्यकिय अधिकारी म्हणतात, “मुंडे यांनी ‘वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणत्याही स्थितीत मुख्यालय सोडायचे नाही असे फर्मावले आहे. या स्थितीत मुलांच्या चांगले शिक्षणासाठी शाळा, हॉटेल्स, पेट्रोल पंप, बँका, गॅस एजन्सी, इतर शासकीय कार्यालये आदी सुविधांची अपेक्षाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कामाच्या अनिश्चित वेळा आणि अल्प वेतनामुळे नवे डॉक्टर्स शासकीय सेवेत येण्यास तयार नाहीत. सर्व कार्यालयांच्या वेळा निश्चित असल्या, तरी वैद्यकीय सेवेचे अनिश्चित आहेत. सततच्या कामाने शारीरिक व मानसिक क्षमतेवर परिणाम होतील, त्याचे दुष्परिणाम रुग्णाला भोगावे लागू शकतात. या स्थितीत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आरोग्य केंद्रात २४ तास पोलीसांची नियुक्तीही असावी. २४ तास सेवेसाठी आरोग्य केंद्रांत किमान चार वैद्यकीय अधिकारी द्यावेत”