► प्रतिनिधी/ बेळगाव
काकतीनजीक हिंडाल्को परिसरात रस्त्याशेजारी बारा फुटाचा अजगर सरपटताना दिसला अन् तेथून ये-जा करणाऱ्यांची भीतीने गाळण उडाली. याचवेळी सर्पमित्र जोतिबा कंग्राळकर यांना अजगराची माहिती देण्यात आली. त्यांनी अजगराला पकडून वन खात्याकडे सुपूर्द केले. बुधवारी रात्री ही घटना घडली.
जोतिबा यांचे मित्र रोहित पाटील, सौरभ सावंत यांनी अजगराला पकडले. सामाजिक कार्यकर्ते विनायक केसरकर यांनी वन विभागातील अधिकारी संजय गस्ती, आनंद गौड यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे अजगर सुपूर्द केला. जोतिबा कंग्राळकर यांनी यापूर्वी अनेक जातींच्या सापांना पकडून जीवदान दिले आहे.