ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या राष्ट्रीय आण्विक सुरक्षा प्रशासन आणि ऊर्जा विभागाच्या नेटवर्कवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. ऊर्जा विभागाचे मुख्य सूचना अधिकारी रॉकी कँपियोन यांनी सायबर हल्ल्याची पुष्टी केली आहे. लवकरच अमेरिका यासंदर्भात निवेदन जारी करणार आहे.
राष्ट्रीय आण्विक सुरक्षा प्रशासन आणि ऊर्जा विभाग अमेरिकेच्या आण्विक साठ्याची देखरेख करतो. हॅकर्सने नेटवर्क हॅक करुन काही गोपनीय फाईल्स चोरल्या आहेत. त्याचा फटका जवळपास 6 फेडरल एजन्सीना बसला आहे. संबंधित विभागाच्या टीमने हॅकिंगची माहिती अमेरिकन काँग्रेस समितीकडे दिली आहे.
न्यू मेक्सिको आणि वॉशिंग्टनची फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन (एफईआरसी), सँडिया राष्ट्रीय प्रयोगशाळा, न्यू मेक्सिको आणि लॉस अलामोस राष्ट्रीय प्रयोगशाळा, वॉशिंग्टन, राष्ट्रीय अण्वस्त्र संरक्षण प्रशासनाचे सुरक्षित परिवहन कार्यालय आणि रिचलँड फिल्ड कार्यालय या संस्थांमध्ये संरक्षण अधिकाऱ्यांनी संशयास्पद हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. हे सर्व विभाग अमेरिकेच्या अण्वस्त्र हत्यारांचे साठे निंयंत्रित करतात आणि सुरक्षित वाहतुकीची निश्चिती करतात. सायबर हल्ल्यात नेमका किती डेटा चोरी झाला, यासंदर्भात माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.