तैपैई / वृत्तसंस्था
तैवानमध्ये गुरुवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत उपसंरक्षणमंत्री आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ शेन यी-मिंग यांचा मृत्यू झाला आहे. जनरल मिंग यांच्यासह 13 जण हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. हेलिकॉप्टर तैवानच्या पर्वतीय क्षेत्रात कोसळले आहे.
हेलिकॉप्टरमधील 8 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतर तैवानच्या अध्यक्षा साई इंग-वेन यांनी 11 जानेवारी रोजी होणाऱया निवडणुकीशी संबंधित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
जनरल मिंग हे चीनचे प्रखर विरोधक मानले जायचे. मे महिन्यात चीनच्या धमक्यांपासून बचावासाठी मिंग यांनी अमेरिकेकडून नव्या लढाऊ विमानांची मागणी केली होती. जनरल मिंग हे सैन्यप्रमुख तसेच वायुदलाचे प्रमुख राहिले आहे. मागील काही काळात तैवानवर दबाव टाकण्यासाठी चीनने स्वतःची लढाऊ तसेच टेहळणी विमाने तैवानच्या क्षेत्रात पाठविण्याचे सत्र आरंभिले आहे.
स्वतंत्र देश असल्याची भूमिका
चीनकडून सादर एक देश, दोन व्यवस्थेचे सूत्र तैवानच्या अध्यक्षा साई इंग-वेन यांनी फेटाळून लावले आहे. अशी व्यवस्था हाँगकाँगमध्ये यापूर्वीच अपयशी ठरल्याने तैवानमध्ये ती लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी म्हटले आहे. चीन तैवानला स्वतःचा भूभाग मानत असून क्षी जिनपिंग यांनी अनेकदा तैवानला बळाच्या जोरावर ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे. पण तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानत आला आहे.
स्वायत्तता कायम ठेवणार
तैवानमध्ये 11 जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अध्यक्षा साई यांनी नववर्षाच्या संबोधनात तैवानची स्वायत्तता अबाधित ठेवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तैवानची लोकशाही आणि स्वातंत्र्य कायम रहावे याकरता व्यवस्था उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. साई यांच्या या मोहिमेला हाँगकाँगमधील निदर्शकांचा पाठिंबा मिळत आहे.