फलटण / प्रतिनिधी :
फलटण शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी 2 ते 8 मे या कालावधीसाठी फलटण शहर व शहराच्या आसपासचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज फलटण शहरात नाकाबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या 40 जणांची वाहने जप्त करण्यात आली. ही जप्त केलेली वाहने वाहन मालकांना आठ दिवसानंतर ताब्यात देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी विनाकारण फलटण शहरात फिरू नये, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.