प्रतिनिधी / सांगली
ज्या कोविड रूग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कोविड रूग्णांची संख्या कमी आहे, अशी रूग्णालये बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कोविड रूग्ण सद्यस्थिती पाहता व संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेमधील रूग्णांची संख्या वाढल्याचे आढळल्यास बंद करण्यात आलेली रूग्णालये पुन:श्च कोविड रूग्णालये म्हणून कार्यान्वित करण्यात येतील, या अटीस अधिन राहून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील एकूण 33 रूग्णालयांना कोविड रूग्णसेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णांवर उपचार करण्यासाठी काही रूग्णालये कोविड रूग्णालये म्हणून घोषीत व कार्यान्वीत करण्यात आलेली होती. सद्यस्थितीत कोविड रूग्णांची संख्या कमी होत आहे व रूग्णांसाठी उपलब्ध खाटांची संख्या आवश्यक प्रमाणात शिल्लक राहत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड रूग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील 33 रूग्णालयांना कोविड रूग्णसेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
या रूग्णालयात नविन रूग्ण दाखल करून घेवू नयेत व सद्यस्थितीत रूग्णालयात दाखल रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर रूग्णालयातील फॅसिलीटी ॲपवरील सर्व माहिती अद्ययावत करावी, प्रशासनाकडून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविले असल्यास ते परत करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.