दिल्लीत अटक केलेल्या आयएस दहशतवाद्यांचा गौप्यस्फोट : देशभरातील बडे राजकीय नेतेही टार्गेटवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत अटक करण्यात आलेल्या आयएस दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अयोध्येतील राम मंदिर, मुंबईचे छाबाद हाऊस या मोठ्या स्थळांसह देशातील काही बडे नेते आपले लक्ष्य असल्याचे दहशतवाद्यांनी कबूल केले आहे. तसेच पुण्याजवळील पश्चिम घाट आणि अहमदाबादजवळच्या काही ठिकाणांची रेकी केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. या नियोजित ठिकाणांवर त्यांना विशिष्ट दिवशी दहशतवादी हल्ला करायचा होता. मात्र, तपास यंत्रणांनी त्यांना वेळीच अटक केल्यामुळे आयएसआयएस मोठा कट उधळला गेल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाने तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दहशतवादी मोहम्मद शाहनवाजला दिल्लीतून, रिझवानला लखनौमधून आणि अर्शदला उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद येथून अटक करण्यात आली. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून देशात हाहाकार माजविण्याचा कट आखल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.
मोहम्मद शाहनवाज याच्याकडून आयईडी बनवण्याचे साहित्य, पिस्तूल आणि त्याची काडतुसे, बॉम्ब बनवण्याचे साहित्य, अनेक कागदपत्रे इ. जप्त करण्यात आली असल्याचे दिल्लीतील स्पेशल सेलचे सीपी एचजीएस धालीवाल यांनी सांगितले. दहशतवादी 26/11 पेक्षा जास्त नुकसान करण्याचा कट रचत होते. त्यानुसार शाहनवाजला स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना मिळाल्या होत्या, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. गेल्या महिन्यातच या लोकांवर बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या लोकांवर विविध बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. यामध्ये मोहम्मद शाहनवाजला त्याच्या अन्य दोन साथीदारांसह अटक करण्यात आली, तर दुसरा आरोपी मोहम्मद रिझवान हा फरार आहे.