आयएनएलडीच्या आघाडीतील प्रवेशावर भडकले : खासदारपुत्रासमवेत दिल्लीत मांडले ठाण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणात इंडियन नॅशनल लोकदलासोबत (आयएनएलडी) काँग्रेस आघाडी करणार असल्याच्या चर्चेदरम्यान माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा भडकले आहेत. हुड्डा यांनी यावरुन पक्षाच्या नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. माजी मुख्यमंत्री हे स्वत:चे पुत्र आणि राज्यसभा खासदार दीपेंद्र सिह हुड्डासोबत दिल्लीत ठाण मांडून आहेत.
आयएनएलडीने हरियाणात 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सन्मान दिन रॅलीचे निमंत्रण काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिले आहे. या रॅलीत सामील होणार नसल्याचे संकेत हु•ा यांनी दिले आहेत. हरियाणातील 10 लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावरून इंडिया आघाडीत सामील काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये वाद होण्याची चिन्हे आहेत. 25 सप्टेंबर रोजी देवीलाल यांच्या जयंती सोहळ्यात कॅथलमध्ये आयएनएलडी विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील झाला तर हा वाद अधिकच तीव्र होणार आहे.
काँग्रेस स्वत:ला मानतेय मजबूत
मागील लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा लढविणाऱ्या काँग्रेसला यावेळी आपण सर्वाधिक मजबूत स्थितीत असल्याचे वाटत आहे. अशा स्थितीत काँग्रेसकडून आप अन् आयएनएलडी या पक्षांकरता त्यांच्या पसंतीचे मतदारसंघ सोडण्याची शक्यता फारच कमी आहे. जागावाटपावरून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, आप संयोजक अरविंद केजरीवाल आणि आयएनएलडीचे महासचिव अभय सिंह चौताला यांच्यात वाद होणे निश्चित असल्याचे मानले जात आहे.
आयएनएलडीचा या जागांवर दावा
राज्यातील सिरसा, हिसार आणि भिवानी लोकसभा मतदारसंघावर दावा केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आयएनएलडीचे नेते अभय चौताला यांनी दिले आहेत. तर आपकडून सिरसा अन् अंबाला लोकसभा मतदारसंघ मागितला जाऊ शकतो. हरियाणात लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांचा दबाव राहिला तरीही हुड्डा हे सोनिपत, रोहतक, भिवानी-महेंद्रगढ समवेत कुठलाच मतदारसंघ सहजपणे अन्य पक्षांना लढविण्यास देण्याचा निर्णय घेतील याची शक्यता कमीच आहे.
काँग्रेस नेत्या कुमाली शैलजा या अंबाला मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. किरण चौधरी यांच्या कन्या श्रुती चौधरी महेंद्रगढ-भिवानी मतदारसंघाच्या दावेदार आहेत. कॅप्टन अजय यादव हे गुरुग्राम मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भूपेंद्र हुड्डा हे सोनिपत तर त्यांचे पुत्र दीपेंद हुड्डा हे रोहतकमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते. अशा स्थितीत तिन्ही पक्षांमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या वाटपावर सहमती होणे अवघड मानले जात आहे.