निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी पर्वणी
ओटवणे प्रतिनिधी
आंबोली घाटातील पायथ्याशी दाणोली नजिक असलेल्या आणि फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन रोजी करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी वनविभाग आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.पारपोली येथे फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म असे वातावरण तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्ध आहेत. त्यामुळे सुमारे १८० प्रकारची विविध फुलपाखरे या गावात आढळतात. यातील फुलपाखरांच्या बहुसंख्य जाती ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये या गावात आढळून येतात. त्यामुळे निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
या महोत्सवात तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली जंगलातील फुलपाखरांची माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. तसेच आंबोलीच्या पायथ्याशी असलेले घनदाट जंगल व दरी खोऱ्यातील विविध दुर्मिळ वन्यजीवांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. फुलपाखरांचा जीवनक्रम व त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे. तसेच पारपोली गावातील पारंपारिक घरात राहण्यासह पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपारिक कला याचा आस्वाद घेण्याची संधी देखील पर्यटकांना मिळेल. निसर्गप्रेमींसह पर्यटकांनी या फुलपाखरू महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी वनविभाग, पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि पारपोली ग्रामपंचायतीने केले आहे.