प्रतिनिधी/ बेळगाव
ईद-ए-मिलादनिमित्त रविवार दि. 1 रोजी बेळगाव शहरामध्ये मुस्लीम धर्म संघटनांच्यावतीने मिरवणूक काढली जाणार आहे. सकाळी 10.30 वाजता जुना धारवाड रोड येथील झेंडा चौकापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक दिवशीच ईद-ए-मिलाद मिरवणूक होणार होती. परंतु जातीय सलोखा राखत मुस्लीम संघटनांनी मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
मुस्लीम धर्माचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद-ए-मिलाद साजरा केला जातो. यानिमित्त दरवर्षी शहरात भव्य मिरवणूक काढली जाते. जुना धारवाड रोड येथून सुरू झालेली मिरवणूक आरटीओ सर्कल, राणी चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक मार्गे कॅम्प येथील असद खान दर्गा येथे सांगता होणार आहे. या मिरवणुकीमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, तसेच मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.