100 फूट खोल दरीत कोसळली पर्यटक बस
वृत्तसंस्था/ निलगिरी
तामिळनाडूच्या निलगिरी जिह्यातील कुन्नूर येथे भीषण अपघात घडला आहे. मारापलमजवळ पर्यटक बस जवळपास 100 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातसमयी बसमध्ये बसचालकासह 59 जण होते. यापैकी 3 महिला आणि 5 पुरुष अशा एकंदर आठ जणांना जीव गमवावा लागला. ही पर्यटक बस कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जात होती. मात्र, शुक्रवारी रात्री या बसला अपघात झाला. बस अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. या बसमधील प्रवासी उटी येथून पर्यटन करून परतत असताना या बसला अपघात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अपघात प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु आहे. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर बस मारापलम येथील 100 फूट दरीत कोसळली. कुन्नूर सरकारी रुग्णालयाचे सहसंचालक पलानी सामी यांनीही 8 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 8 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.