निफ्टीही 51 अंकांनी मजबूत : सिग्नेचर ग्लोबलचे समभाग तब्बल 19 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात अखेर बुधवारच्या सत्रात तेजीचा माहोल राहिला. यामध्ये दिवसभरातील कामगिरीमध्ये सेन्सेक्स 173 तर निफ्टी 51 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. यावेळी 30 समभागांपैकी 21 समभाग तेजीत आणि 9 समभाग घसरणीत राहिले आहेत. बुधवारी सिग्नेचर ग्लोबल कंपनीचे समभाग हे 19.35 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत.
दिवसभरात लार्सन अॅण्ड टुब्रो, कोल इंडिया आणि आयटीसी यांचे समभाग हे तेजीत अव्वल राहिले. तर टायटन, ग्रासिम आणि हिरोमोटो कॉर्प यांचे समभाग प्रभावीत झाले आहेत. बुधवारच्या सत्रात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 5 पैशांनी मजबूत होत 83.23 रुपयांवर बंद झाला.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स बुधवारी 173.22 अंकांनी वधारुन निर्देशांक 66,118.69 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 51.75 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 19,716.45 वर बंद झाला आहे.
सिग्नेचर ग्लोबल 15.32 टक्क्यांवर प्रीमियम लिस्ट
बुधवारच्या सत्रात सिग्नेचर ग्लोबल लिमिटेडचे चांगले लिस्टिंग झाले आहे. एनएसईवर कंपनीचे समभाग हे 15.32 टक्क्यांच्या प्रीमियमसोबत 444 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. तर बीएसईवर 15.58 टक्क्यांसोबत 445 रुपये प्रति समभाग लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर यामध्ये तेजी राहिली होती. सेन्सेक्समध्ये सनफार्मा, इंडसइंड बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि अल्ट्राटेक सिमेंट तेजीत तर बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, टायटन आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
अन्य कंपन्यांमध्ये मात्र वेदान्ताचे समभाग हे 6.69 टक्क्यांनी नुकसानीत राहिले तर ऐबी कॉट्सपिन 4.97 टक्क्यांनी घसरले तसेच फ्युचर लाईफस्टाईल, केआयओसीएल आणि जेंसार टेक्नॉलॉजी यांचे समभाग हे प्रभावीत राहिले.