शहर बाजारपेठेत घेतले ताब्यात
चिपळूण / प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाने बेकायदा गुटखा साठ्यावर केलेल्या कारवाईनंतर गुटखा पुरवठा करणाऱ्या पोलिसांकडून शोध सुरु होता. यातूनच गुटखा सप्लायर किंगमेकर अशी ओळख असलेल्या एकाला चिपळूण पोलिसांनी गुरुवारी शहर बाजारपेठेतून ताब्यात घेत अटक केली. त्याने हा गुटखा कोठून आणला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
आनंद नागाप्पा पुजारी (खेंड-चिपळूण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई व रत्नागिरी अन्न-औषध प्रशासनाच्या पथकाने शहर बाजारपेठेतील रुमानी चेंबर येथे सिध्देश सचिन खेराडे याचा 3 लाख 46 हजार 479 रूपये तसेच रंगोळा साबळे मार्गावरील नजराणा अपार्टमेंट येथून शहनवाज मुस्ताक कच्छी, मुस्ताक झिकर अब्दुल गणी कच्छी, समीर अयुब शेख यांच्याकडील 1 लाख 475 रुपये किंमतीचा बेकायदा गुटखा साठा जप्त केला होता. या प्रकरणी चिपळूण पोलिसात या चौघावर गुन्हा दाखल झाला होता. या धडक कारवाईनंतर बाजारपेठेतील गुटखा विकेत्यांचे धाबे दणाणले होते.
असे असतानाही अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईनंतर व्यावसायिकांवर कोणताच परिणाम झालेला नसल्याने यातूनच छुप्या पध्दतीने जोरदार गुटखा विक्री सुरु होती. सिध्देश खेराडे व मुस्ताक कच्छी यांना गुटखा पुरवठा करण्याच्या काही दिवसांपासून पोलीस गुटखा सप्लायरचा शोध घेत होते. अखेर तपासातून आनंद पुजारी हा गुटखा पुरवठा करत असल्याचे पुढे येताच पोलिसांनी आनंद याचा शोध घेत त्याला शुक्रवारी पोलिसांनी शहर बाजारपेठेतून ताब्यात घेत अटक केली. आनंद पुजारी हा गुटखा सप्लाय किंगमेकर असून त्याला तालुक्यासह अन्य ठिकाणी अनेक वर्षापासून गुटखा सप्लायर म्हणून ओळखले जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याने हा गुटखा कोठून आणला तसेच यामध्ये स्थानिक आणखी सहभागी आहेत का, याचा पोलिसांना शोध घेत आहेत.