कोल्हापूर व इचलरंजी शहरासह करवीर, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले तालुक्यात सुरुवात
पुरवठा विभागाची माहिती, आजपासून उर्वरीत तालुक्यात वितरण
कोल्हापूर प्रतिनिधी
दिवाळी सणानिमित्त राज्य सरकारने अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांसाठी 100 रुपयात प्रत्येकी एक किलो प्रमाणात साखर, रवा, चणाडाळ व पामतेल या शिधावस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बहुतांश वस्तू जिह्यातील गोदामात दाखल झाल्या आहेत. शुक्रवारपासून कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह करवीर, कागल, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यातील कार्डधारकांना त्याचे वाटप सुरु करण्यात आले. तर आज शनिवारपासून उर्वरीत तालुक्यातील कार्डधारकांना वस्तूंचे वितरण होणार आहे.
शिधावस्तूंच्या पॅकेज वाटपाची सुरुवात कोल्हापूर शहरातील विक्रमनगर येथील रेशन दुकानामध्ये रेशन दुकानदार संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी रमेश आवळे, सुनील दावणे, सुरेश पाटील, संजय चौगुले, राजेश मंडलिक, अशोक सोलापुरे, अरुण शिंदे, दीपक शिराळे, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने एक महिन्यासाठी रेशनकार्डधारकांकरीता चार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला आहे. जिह्यातील सुमारे साडे पाच लाख रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. यातील बहुतांश वस्तू जिह्यातील गोदामांमध्ये आल्या आहेत, काही ठिकाणी काही वस्तू येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या वस्तूंचे जिह्यात दोन टप्प्यात वाटप करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे. त्यानुसार शुक्रवारी कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर, करवीर, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये या वस्तूंचे वाटप सुरु करण्यात आले. तर उर्वरीत तालुक्यात एक जिन्नस आला नसल्याने हे पॅकेज वाटप सुरु करण्यात आलेले नाही, तो आल्यानंतर आज, शनिवारपासून त्याचे वाटप केले जाणार आहे. चार वस्तू असल्याशिवाय पॅकेजचे वाटप करु नयेत, असे सरकारचे आदेश आहेत. त्यामुळे बहुतांश तालुक्यात तीन वस्तू आल्या असल्या तरी त्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली नाही. आज, शनिवारी ही वस्तू आल्यानंतर या पॅकेजचे उर्वरीत तालुक्यांमधील दुकानातून वाटप केले जाणार आहे, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.