राष्ट्रीय 14 वर्षाखालील मुलींची फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मान्यताप्राप्त केएसएफए व बीडीएफए फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य को-ऑप. सोसायटी पुरस्कृत राष्ट्रीय उपकनिष्ठ 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून दिल्लीने ओडिशाचा 2-1 असा तर कर्नाटकाने उत्तर प्रदेशचा 4-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लव्हडेल स्कूलच्या मैदानावरत आयोजित केलेल्या उपकनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात दिल्लीने ओडिशाचा 2-1 असा गोल फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 8 मिनिटाला ओडिशाच्या पबिता नाईकच्या पासवर आचल सिंगने सुरेख गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 21 व्या मिनिटाला दिल्लीच्या निकीता सिंगने गोल करण्याची नामी संधी दवडली. त्यामुळे पहिल्या सत्रात ओडिशाने आघाडी मिळविली होती. दुसऱ्या सत्रात दिल्लीने आक्रमक चढाया सुरू केल्या. 49 व्या मिनिटाला कर्णधार प्राचीच्या पासवर कर्णधार निकिता नेगीने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 56 व्या मिनिटाला दिल्लीच्या संगीताच्या पासवर ध्वनी बिदादाने दुसरा गोल करून 2-1 ची आघाडी दिल्लीला मिळवून दिली. त्यानंतर ओडिशाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात कर्नाटका संघाने उत्तर प्रदेश संघाचा 4-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात चौथ्याच मिनिटाला कर्णधार अंजली पटेलने वेगवान फटका गोलपोस्टमध्ये मारला. तो चेंडू गोलरक्षकाने अडविण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू गोलरक्षकाच्या हाताला लागून गोलमुखात शिरला व 1-0 ची आघाडी उत्तर प्रदेशने मिळविली. पहिले सत्र संपण्यास काही सेकंद बाकी असताना कर्नाटकाच्या अद्विका कनोहीच्या पासवर चरिष्मा लुईसने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. दुसऱ्या सत्रात कर्नाटक संघाने आपल्या छोट्या पासद्वारे आक्रमक चढाया सुरू केल्या. 45 व्या मिनिटाला कर्नाटकाच्या राईट आऊटर सान्या शहाने दिलेल्या अप्रतिम पासवर याशिका हिने हेडरद्वारे दुसरा गोल करून 2-1 ची आघाडी मिळवून दिली. 67 व्या मिनिटाला आद्याने दिलेल्या सुरेख पासवर रिना जोकोबने हेडरद्वारे तिसरा गोल करून 3-1 ची आघाडी कर्नाटकाला मिळवून दिली. 52 व्या मिनिटाला चरिष्मा लुईसने गोल करून 4-1 ची आघाडी मिळवून दिली. शनिवारी स्पर्धेला सुट्टी असून रविवारी अंतिम लढत कर्नाटक वि. दिल्ली यांच्यात दुपारी 4 वाजता खेळविण्यात येणार आहे.