दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर मानहानीचा खटला चालणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ रि-ट्विट केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हेगारी मानहानीचा खटला रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या निर्णयामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होऊ शकते. साहजिकच यूट्यूबरचा व्हिडिओ रि-पोस्ट केल्याच्या प्रकरणात त्यांना मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे लागेल.
अरविंद केजरीवाल यांनी कनिष्ठ न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात समन्स जारी करण्याच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. अरविंद केजरीवाल यांना मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात आणि त्यांना व्हिडिओ पुन्हा पोस्ट करण्याचे परिणाम समजतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.