सदरचे ध्येय 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे संकेत : कंपनीची 45 हजार कोटी गुंतवणूकीची योजना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी 2030 पर्यंत आपली कार उत्पादन क्षमता दुप्पट करण्याची योजना आखत असून यासाठी कंपनी 5.5 अब्ज डॉलर (सुमारे 45.18 हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. उत्पादन क्षमता वाढवून कंपनी स्थानिक बाजारपेठेत आपला हिस्सा वाढवणार असून सोबत निर्यातही वाढवण्यात येणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गुंतवणुकीनंतर, कंपनी 2 नवीन सुविधांमध्ये 2.50 लाख युनिट्सच्या उत्पादन क्षमतेसह 8 असेंबली लाइन सुरू करेल. हरियाणातील खरखोडा येथे पहिल्या उत्पादन युनिटचे बांधकाम सुरू झाले आहे. उत्पादन युनिट
सुरू करण्याची मुदत वाढवता येऊ शकते.
एका माहितीनुसार , कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मारुती सुझुकीचे सध्या गुजरातमधील महेसाणा आणि गुरुग्राममधील मानेसर येथे 2 दशलक्ष युनिट्सची एकूण उत्पादन क्षमता असलेले कारखाने आहेत.
खरखोडा प्रकल्पातील उत्पादन क्षमता वाढविण्यास मान्यता
मारुती सुझुकीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कंपनीला खरखोडा प्रकल्पामध्ये उत्पादन क्षमता 10 लाख युनिटने वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे. यासोबतच कंपनीला दुसऱ्या जागेवर 10 लाख युनिट्सच्या उत्पादनासाठी मुख्य मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चेअरमन आर सी भार्गव म्हणाले की, आमच्याकडे पूर्वी जवळपास 50 टक्के बाजारातील हिस्सा होता, जो आम्हाला परत मिळवायचा आहे. याशिवाय, कंपनी नजीकच्या भविष्यात अनेक एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्यातक आहे. मारुती सुझुकी आर्थिक वर्ष 2023 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्यातक बनली आहे. कंपनीने दशकाच्या अखेरीस 7.50 लाख युनिट्सची निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जे मागील आर्थिक वर्षात 2.59 लाख युनिट्स होते.