अखर्चित निधीबाबत सीईओंनी व्यक्त केली नाराजी; बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय
प्रतिनिधी कोल्हापूर
मागासवर्गीय गावांना वस्त्यांना व रस्त्यांना जातीवाचक नावे आहेत. त्यांना समता निर्माण करणारे उदात्त नाव देण्याबाबत ग्रामपंचायतींमध्ये ठराव करून ते एक आठवड्यात जिल्हा परिषदेकडे पाठवावेत असे निर्देश जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेतील समाजकल्याण समितीच्या बैठकीत दिले. सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.समाजकल्याण समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे सहाय्यक लेखा अधिकारी संजय खारगे, श्रीमती सुवर्णा नागरगोजे व पंचायत समिती कार्यालयातील समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निधी अखर्चित निधीबाबत आठवड्याभरात अहवाल पाठवा अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास योजनेअंतर्गत मार्च अखेरपर्यंत अनेक गावांनी शंभर टक्के निधी खर्च केलेला नाही. त्याबाबत सीइओ चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. सदरचा निधी अखर्चित का राहिला याबाबतचा अहवाल तयार करून एक आठवड्याच्या आत समाज कल्याण विभागाकडे सादर करावा असे आदेश सीईओ चव्हाण यांनी दिले. रमाई वाचनालय अंतर्गत समाजामध्ये समता निर्माण करणाऱ्या लेखकांची पुस्तके निश्चित करून शासकीय प्रेसमधून खरेदी करून देणे देण्याचा बैठकीत निर्णय झाला.
मागासवर्गीय बचत गटांना दिले जाणार प्रोत्साहन
जिल्ह्यातील मागासवर्गीय बचत गटांना त्यांचे अर्थाजन होण्यासाठी प्रोत्साहनदेण्याचा बैठकीत निर्णय झाला. त्यानुसार कोल्हापूर तयार होणाऱ्या फळावर प्रक्रिया करणारी यंत्रे, रेशीम उद्योगाला चालना देणारी यंत्रसामग्री व इतर साहित्य पुरविणे, मधुमक्षिका पालन करू इच्छिणाऱ्या बचत गटांना त्यांचे ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना यंत्रसामग्री देणे तसेच पारंपारिक शेवया यंत्र, पापड करणे, कुल्फी तयार करणे आदी यंत्राचे वाटप करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
मागासवर्गीय वसाहतीमध्ये मुक्त जीम अन् तालीम
मागासवर्गीय वसाहतीमध्ये शारीरिक व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाकडील मंजूर मुक्त जिमच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे साहित्य खरेदी करून देण्याचा बैठकीत निर्णय झाला. तसेच मागासवर्गीय वसाहतीमध्ये असणाऱ्या कुस्ती खेळामध्ये आवड निर्माण होण्यासाठी तालीम तयार करण्याचे निश्चित झाले.
मेडिकल व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप
मेडिकल व इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच अस्थिव्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी इलेक्ट्रिक सायकल देण्याचाही निर्णय झाला.