उपविभागीय दंडाधिकारी यांचा निर्णय
कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तुणकीचा ठपका
उचगाव प्रतिनिधी
वळीवडे ता.करवीर येथील पोलीस पाटील दीपक प्रकाश पासाण्णा यांना कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तणूक केल्याबद्दल करवीरचे उपविभागीय दंडाधिकारी हरीष धार्मिक यांनी सहा महिन्यासाठी निलंबित केल्याचा आदेश दिला. याबाबतची तक्रार वळिवडेचे ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत सन्मत दिगंबरे यांनी केली होती.
पोलीस पाटील दीपक पासाण्णा २०१६ ला पोलीस पाटील पदावर रुजू झाले. त्यांनी वळीवडेत २०१९ ला आलेल्या पुरात नुकसान न झालेल्या व्यक्तींची नावे यादीत समाविष्ट केली होती. तसेच राष्ट्रीय पक्षाने भारत जोडो यात्रा काढली होती. त्या यात्रेत राष्ट्रीय पक्षाचा टी-शर्ट घालून राजकीय सहभाग नोंदविला होता. दिगंबरे यांना पोलीस पाटील पासाण्णा यांनी धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद केली होती. त्यानुसार दंडाधिकाऱ्यांनी गांधीनगर पोलीसांना चौकशी अंती अहवाल मागवला होता. त्यानुसार कर्तव्यात कसूर व गैरवर्तुणकीचा ठपका ठेवत करवीर चे उपविभागीय दंडाधिकारी यांनी २२ सप्टेंबरला पोलीस पाटील दीपक पासाण्णा यांना सहा महिन्यासाठी निलंबित केले आहे.