मडगाव : ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त आज गुरूवार दि. 28 रोजी मुस्लिम बांधवांकडून जुलूस काढण्यात येणार आहे. या जुलूसचा मार्ग काल बुधवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आला. यंदा जुलूस पुन्हा एकदा मडगाव पालिका उद्यानाजवळ निघणार आहे. यंदाच्या जुलूसमध्ये दुचाकी, कार तसेच इतर वाहनांचा समावेश न करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई हे मंत्री असताना त्यांनी जुलूसच्या मार्गात बदल करताना जुलूस फातोर्डा रवींद्र भवन पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यंदा जुलूस पुन्हा एकदा मडगाव पालिकेच्या उद्यानापर्यंत नेण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती उर्फान मुल्ला यांनी दिली. याकामी मडगावचे आमदार दिगंबर कामत व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहकार्य केल्याने श्री. मुल्ला यांनी त्यांचे आभार मानले आहेत. दर वर्षी जुलूसमध्ये दुचाकी तसेच कार व इतर वाहनांचा समावेश केला जायचा. परंतु, यंदा वाहनांचा समावेश न करता, सर्वांनी चालतच या जुलूसमध्ये सहभागी व्हावे असा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी अस्विन चंद्रू, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाले, पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई, मडगावचे पोलीस निरीक्षक तुळशिदास नाईक व इतरांची उपस्थिती होती.
Previous Articleप्रतिमा कुतिन्होची ‘आप’ला सोडचिठ्ठी
Next Article दोन महिलांच्या ‘आधार’ कार्डवर समान क्रमांक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.