आयपीएल 16 : शुबमन गिलचे शानदार अर्धशतक, गुजरातची भेदक गोलंदाजी, सामनावीर मोहित शर्माचे 2 बळी
वृत्तसंस्था /मोहाली
टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील येथे गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सचा एक चेंडू बाकी असताना 6 गड्यांनी विजय नोंदविला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने 20 षटकात 8 बाद 153 धावा जमविल्या. त्यानंतर गुजरात टायटन्सने 19.5 षटकात 4 बाद 154 धावा जमवित आपला या स्पर्धेतील तिसरा विजय नोंदविला. शुबमन गिलचे शानदार अर्धशतक तसेच राहुल तेवातियाने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मारलेला विजयी चौकार हे वैशिष्ट्या ठरले. मोठे आव्हान नसले तरी गुजरातला शेवटच्या षटकापर्यंत झगडावे लागले. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून पंजाब संघाला प्रथम फलंदाजी दिली. पंजाबच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. शमीच्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीचा फलंदाज प्रभसिमरन सिंग रशिद खानकरवी खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. कर्णधार शिखर धवन आणि शॉर्ट या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी अठरा चेंडूत 28 धावांची भागीदारी केली. लिटलने धवनला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. रशिद खानच्या फिरकीवर शॉर्टचा त्रिफळा उडाला. त्याने 24 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 36 धावा जमविल्या. मोहित शर्माने त्यानंतर जितेश शर्माला यष्टीरक्षक सहाकरवी झेलबाद केले. त्याने 23 चेंडूत 5 चौकारांसह 25 धावा जमविल्या. भाणूका राजपक्षे जोसेफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 26 चेंडूत 1 चौकारासह 20 धावा केल्या. पंजाबची यावेळी स्थिती 16.5 षटकात 5 बाद 115 अशी होती. सॅम करणने 22 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 22 तसेच शाहरुख खानने 9 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 22 धावा जमविल्या. ब्रारने 1 षटकारासह नाबाद 8 धावा केल्या. पंजाबच्या डावामध्ये गुजरातने 9 वाईडसह एकूण 11 अवांतर धावा दिल्या. पंजाबच्या डावात 5 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. पंजाबच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. गुजराततर्फे मोहित शर्माने 2 तर शमी, लिटल, जोसेफ, रशिद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पंजाबचे 2 फलंदाज धावचीत झाले.
गिलचे शानदार अर्धशतक
प्रत्युत्तरादाखल खेळताना शुबमन गिल आणि यष्टीरक्षक साहा यांनी सलामीच्या गड्यासाठी 28 चेंडूत 48 धावांची भागीदारी केली. पंजाब संघातील रबाडाने साहाला झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. साहा बाद झाल्यानंतर गिल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 41 धावांची भर घातली. अर्शदीप सिंगने 12 व्या षटकात साई सुदर्शनला झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 2 चौकारांसह 19 धावा जमविल्या. हरप्रित ब्रारने कर्णधार हार्दिक पंड्याला करणकरवी झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा केल्या. गिलने डेव्हिड मिलरला साथीला घेत संघाला विजयाच्या समिप नेले. करणच्या शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ड्राईव्हचा फटका मारण्याच्या नादात गिलचा त्रिफळा उडाला. त्याने 49 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 67 धावा झळकाविल्या. गिल बाद झाला त्यावेळी गुजरातला विजयासाठी शेवटच्या चार चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. मिलर आणि तेवातिया यांनी या षटकातील चौथ्या चेंडूवर चोरटी धाव घेतली. दरम्यान, तेवातियाने करणच्या या षटकातील पाचव्या चेंडूवर विजयी चौकार ठोकला. मिलर 18 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 17 तर तेवातिया 2 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 5 धावा जमविल्या. गुजरातच्या डावात 1 षटकार, 17 चौकार नोंदविले गेले. पंजाबतर्फे अर्शदीप सिंग, रबाडा, हरप्रित ब्रार आणि सॅम करण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज् इलेव्हन पंजाब : 20 षटकात 8 बाद 153 (प्रभसिमरन सिंग 0, शिखर धवन 8, मॅथ्यू शॉर्ट 36, राजपक्षे 20, जितेश शर्मा 25, सॅम करण 22, शाहरुख खान 22, ब्रार नाबाद 8, ऋषी धवन 1, अवांतर 11, शमी 1-44, लिटल 1-31, जोसेफ 1-32, रशिद खान 1-26, मोहित शर्मा 2-18).
गुजरात टायटन्स : 19.5 षटकात 4 बाद 154 (साहा 30, शुभमन गिल 67, साई सुदर्शन 19, हार्दिक पंड्या 8 मिलर नाबाद 17, तेवातिया नाबाद 5, अवांतर 8, अर्शदीप सिंग 1-33, रबाडा 1-36, ब्रार 1-20, करण 1-25).