राजापूर : वार्ताहर
राजापूर शहरानजीकच्या कोंढेतड येथील जिल्हा परिषद शाळा नं.2 ही सातवीपर्यंतची शाळा असून तीसहून अधिक पटसंख्या आहे. मात्र मंजूर चारपैकी सद्यस्थितीमध्ये शाळेमध्ये दोनच शिक्षक कार्यरत आहेत. अपुऱ्या शिक्षक संख्येचा मुलांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याने तातडीने शिक्षक द्यावा या मागणीसाठी कोंढेतड येथील ग्रामस्थ, पालकांनी आज पंचायत समितीवर धडक दिली. तात्काळ शिक्षक उपलब्ध करून द्यावा अन्यथा, मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाही, असा इशारा कोंढेतड येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, भाजपा युवा मोर्चाचा तालुका सरचिटणीस आणि कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांच्यासमवेत कोंढेतडच्या माजी सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नेहा कुवळेकर, प्रकाश शिंदे, पायल कुळी, संजीवनी कुळी, सानिका नलावडे, अमिषा तिर्लोटकर, आयेषा कोतरे, प्राजक्ता धोपटे, आसावरी परवडे, महेश कुवळेकर, निशा कोंडस्कर, सिद्धी जड्यार, अंकीता धोपटे यांनी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी संजीव वडके, केंद्रप्रमुख विजयकुमार पंडीत यांना निवेदन दिले.