कोहलीचेही दमदार अर्धशतक, पंजाब किंग्सचा 24 धावांनी पराभव : सामनावीर मोहम्मद सिराज : 21 धावांत 4 बळी,फॅफ डु प्लेसिस : 56 चेंडूत 83 धावा,विराट कोहली : 59 धावा
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2023/04/20SPO-03-faf-du-plessis-1024x682.jpg)
वृत्तसंस्था /मोहाली
‘सामनावीर’ मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी तसेच फॅफ डु प्लेसिस आणि कर्णधार विराट कोहली यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने पंजाब किंग्सचा 24 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील बेंगळूरचा हा तिसरा विजय असून या स्पर्धेत बेंगळूरच्या बाहेरील त्यांचा हा पहिला विजय आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 20 षटकात 4 बाद 174 धावा जमवल्या. त्यानंतर पंजाब किंग्स संघाचा डाव 18.2 षटकात 150 धावात आटोपला. या स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 6 पैकी 3 सामने जिंकत 6 गुण घेतले आहेत तर पंजाब किंग्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत. त्यांनीही सहा गुण नोंदवले आहेत. या सामन्यात कर्णधार शिखर धवन उपलब्ध होऊ शकला नाही. शिखर धवनला या स्पर्धेत दोन सामन्यांना मुकावे लागले आहे. या सामन्यात डु प्लेसिसला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवडले गेले. त्याला दुखापत झाली होती. तरीही त्याने 56 चेंडूत 84 धावा झोडपताना हंगामी कर्णधार विराट कोहली समवेत सलामीच्या गड्यासाठी 137 धावांची भागीदारी केली. डु प्लेसिसला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आल्याने कोहलीकडे या सामन्याचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2023/04/20SPO-04-virat-2-1024x682.jpg)
कर्णधार कोहली आणि डु प्लेसिस या सलामीच्या जोडीने आक्रमक फटकेबाजी करताना पहिल्या 10 षटकात 91 धावा जमवल्या होत्या. बेंगळूरचा संघ या सामन्यात 200 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत असतानाच पंजाबच्या गोलंदाजांनी मधल्या आणि शेवटच्या टप्प्यातील खेळात शिस्तबद्ध गोलंदाजी केल्याने बेंगळुरला 174 धावापर्यंत मजल मारता आली. विराट कोहलीने 47 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 59 तर डु प्लेसिसने 56 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारासह 84 धावा झोडपल्या. या जोडीने 16.1 षटकात 137 धावांची भागीदारी केली. पंजाबच्या ब्रारने कोहलीला शर्माकवरी झेलबाद केले. त्यानंतर ब्रारने आपल्या याच षटकातील पुढील चेंडूवर मॅक्सवेलला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. इलिसने डु प्लेसिसला करणकरवी झेलबाद केले. अर्षदीप सिंगने दिनेश कार्तिकला 7 धावावर बाद केले. लोमरोर 7 धावावर तर शहबाज अहमद 5 धावावर नाबाद राहिले. बेंगळूरच्या डावात 3 वाईड, एक नोबॉल आणि 8 लेगबाईज असे एकूण 12 अवांतर धावा नोंदवल्या गेल्या. बेंगळूरच्या डावात 6 षटकार आणि 12 चौकार नोंदवण्यात आले. पंजाबतर्फे ब्रारने 2 तर अर्शदीप सिंग आणि इलिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
बेंगळूरने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना पंजाब किंग्स संघाचे फलंदाज मोहमद सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर खेळाच्या पहिल्याच षटकात बाद झाल्याने त्यांना अखेरच्या टप्प्यात धावांचा पाठलाग करणे अवघड गेले. पंजाबतर्फे जितेश शर्माने एकाकी लढत 27 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 41 धावा जमवल्या. तर सलामीच्या प्रभसिमरन सिंगने 30 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारासह 46 धावा केल्या. तायडे 4, मॅथ्यू शॉर्ट 8, लिव्हिंगस्टोन 2, हरप्रितसिंग 1 षटकार आणि 1 चौकारासह 13, हंगामी कर्णधार सॅम करन 1 चौकारासह 10, शाहरुख खान 1 षटकारासह 7, ब्रार 1 चौकारासह 13 तर इलिसने 1 धाव जमवली. या सामन्यात मोहमद सिराजने 21 धावात 4 तर हसरंगाने 39 धावात 2 तसेच पार्नेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पंजाबचे दोन फलंदाज धावचित झाले. पंजाबच्या डावात 10 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. बेंगळूर संघाची सलामीची जोडी डु प्लेसिस आणि कोहली यांच्याकडून गेल्या काही सामन्यामध्ये फलंदाजीत सातत्य असल्याने बेंगळूरला सामने जिंकणे शक्य झाले आहे.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकात 4 बाद 174 (डु प्लेसिस 84, कोहली 59, कार्तिक 7, लोमरोर नाबाद 7, शाहबाज अहमद नाबाद 5, मॅक्सवेल 0 अवांतर 12, ब्रार 2-31, अर्षदीप सिंग 1-34, इलिस 1-41), पंजाब किंग्स 18.2 षटकात सर्वबाद 150 (तायडे 4, प्रभसिमरन सिंग 46, शॉर्ट 8, लिव्हिंगस्टोन 2, हरप्रित सिंग 13, सॅम करन 10, जितेश शर्मा 41, शाहरुख खान 7, ब्रार 13, इलिस 1, अवांतर 5, मोहमद सिराज 4-21, हसरंगा 2-39, पार्नेल 1-32, हर्षल पटेल 1-22).