माडग्याळ, वार्ताहर
जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील विषबाधा प्रकरणी पाच जणांवर उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. यात दोन मुख्याध्यापक व दोन अधीक्षकांचा समावेश आहे.
हे ही वाचा >>> अनपेक्षित घटना अन् एका आदर्श शिक्षण संकुलास डाग! पालकांसह विद्यार्थीही हळहळले
समता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील निवासी शाळेतील मुलांना अन्नातून १७५ मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुलांची जिवित व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणण्याची कृती केल्याबद्दल पाच जणांना दोषी धरून पाच जणांवर दाखलपात्र व जामीनपात्र गुन्हा उमदी पोलिसात मंगळवार दाखल करण्यात आला. श्रीशैल कल्लापा होर्तीकर, सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्तीकर, सुरेश चनगोंडा बगली, विकास तुकाराम पवार व अक्कमहादेवी सिद्धांना निवर्गी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक शिंदे हे करीत आहेत. तर याच प्रकरणी समाज कल्याण विभागानेही कारवाई बगडा उगारला आहे. आश्रम शाळेचे दोन मुख्याध्यापक व दोन्ही अधीक्षकांवर सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, समता प्राथमिक आश्रम शाळा ही माजी जिल्हा परिषद चन्नाप्पा चनाप्पा होर्तीकर यांच्या सर्वोदय शिक्षण संस्थेमार्फत चालविण्यात येते. येथे निवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. संस्थाचालकांच्या घरातीलच एका कार्यक्रमानंतर शिल्लक राहिलेले जेवण रविवारी सायंकाळी विद्यार्थ्यांना दिले गेल्यामुळे जवळपास 168 विद्यार्थ्यांना जळजळ मळमळ उलटी जुलाब सुरू झाले होते. रविवारी रात्री अकराच्या सुमारास सदरच्या विद्यार्थ्यांना माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालय व मिरज येथील शासकीय रुग्णालयात काही विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले होते.
दरम्यान, दोन दिवसांच्या उपचारानंतर आत्ता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. सर्व विद्यार्थी हे आपापल्या शाळेत परत आलेले आहेत. मात्र याप्रकरणी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाहेरील जेवण निष्काळजीपणे देऊन विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती केल्यामुळे संबंधित आश्रम शाळेच्या पाच लोकांवर शासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.