पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यस्तरीय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना केली आहे. राज्यातील महाविद्यालयांच्या शैक्षणिक लेखापरीक्षणाचा, महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या कामाचा आढावा घेऊन नॅक मूल्यांकन वाढवणे, शैक्षणिक गुणवत्तेसाठी उपाययोजना सुचवण्याचे काम या कक्षाकडून करण्यात येईल.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत मार्गदर्शक तत्त्वानुसार शिक्षणात गुणवत्ता राखून सुसूत्रता आणण्यासाठी निरक्षण पद्धत सुलभ करण्यासाठी राज्यात राज्यस्तरीय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष 2016 मध्ये स्थापन करण्यात आला होता. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे 2016मध्ये कक्ष स्थापनेबाबतचा शासन निर्णय अधिक्रमिक करून नव्याने राज्यस्तरीय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नव्याने स्थापन केलेल्या राज्यस्तरीय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामध्ये रुसा प्रकल्प संचालक, उच्च शिक्षण संचालक, तंत्रशिक्षण संचालक, मुंहबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी यांच्यासह एकूण नऊ सदस्यांचा समावेश आहे. या कक्षाच्या कार्यकक्षेमध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावरील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाला शैक्षणिक लेखापरीक्षण, क्षमता विकासाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन, मूल्यांकनाची प्रक्रिया गतिमान करणे, नॅक मूल्यांकनासाठीच्या अडचणींबाबत मार्गदर्शन करणे आदी घटकांचा समावेश आहे.