लहानपणी प्रत्येकाने, मोठेपणी आपण कोण होणार याची स्वप्ने पाहिलेली असतात हे सर्वज्ञात आहे. अशी स्वप्ने न पाहणारी व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल. कोणाला डॉक्टर व्हायचे असते. तर कोणाला इंजिनियर होण्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे वैमानिक किंवा शास्त्रज्ञ, खेळाडू किंवा अभिनेता बनण्याची स्वप्ने पाहिली जातात. प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही. बहुतेकांची पूर्ण होतच नाहीत, हे वास्तव आहे. कालांतराने हे वास्तव स्वीकारावे लागते. स्वप्ने विसरावी लागतात आणि वस्तुस्थिती स्वीकारावी लागते, असा अनुभव असतो.
स्वप्ने ही प्रामुख्याने भव्यदिव्यच पाहिली जातात. पण अमेरिकेत इसाबेल अनाया नामक एक महिला अशी आहे की जिने अगदी बालपणापासून म्हणजे ती पाच सहा वर्षांची असल्यापासून ‘खुशालचेंडू’ होण्याचेच स्वप्न पाहिले होते. काहीही काम करावे न लागता सर्व सुखांनी आपल्या पायाशी लोळण घ्यावी असेच तिला वाटत असे. आपल्या या स्वप्नाशी ती इतकी प्रामाणिक होती की तिने दुसरे काही बनण्याचा प्रयत्नच केला नाही. अखेरीस तिचे हे स्वप्न साकार झाले. मात्र, त्यासाठी तिला तिच्या वयाच्या 43 व्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. बालपणी ती आपल्या मातापित्यासह मॉल्स किंवा हॉटेलांमध्ये जात असे. तिथे तिला अशा खुशालचेंडू महिला दिसत. या महिलांचा खर्च प्रचंड असे हे देखील तिला दिसत असे. त्यामुळे आपण मोठेपणी तसेच व्हावे असे तिला वाटू लागले. हे स्वप्न साकारण्यासाठी तिला तसा जोडीदार मिळणे आवश्यक होते, जो गर्भश्रीमंत असेल आणि तिला मन मानेल तसा पैसा खर्च करण्याची मुभा देईल. वयाच्या 43 व्या वर्षी तिला तसा जोडीदार मिळाला आहे. तो प्रचंड श्रीमंत आहे आणि तिच्यापेक्षा वयाने 20 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षांपूर्वी त्यांची भेट झाली. सहा महिने डेटिंग केल्यानंतर त्याने तिच्याशी विवाह केला आणि तिचे स्वप्न साकार झाले. आता काहीही काम न करता ती हवा तेवढा पैसा खर्च करु शकते.