तळकोकणात हौशी रंगभूमीला चांगले दिवस आहेत. इथे केवळ आवड म्हणून हौसेपोटी नाटक केले जाते. त्यामुळे तंत्रशुद्धतेकडे दुर्लक्षच होतो. हे चित्र बदलायला हवे. व्यावसायिक दृष्ठीकोनातून नाटक बसवले गेले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात अध्ययावत नाट्यगृहाची उभारणी व्हायला हवी. तरच येथील रंगभूमी खऱ्याअर्थाने समृद्ध होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विवेक गोरे यांनी मळगाव येथे केले.
येथील शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग तर्फे आयोजित ‘मराठी रंगभूमी अभिवादन’ कार्यक्रमात ते बोलत होते. 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. शाश्वत सेवा संस्थेतर्फे सन टीव्ही मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या क्षेत्रपाल वेतोबा या मालिकेच्या चित्रीकरण सेटवर मराठी रंगभूमी अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विविध मालिका व चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अनिल चव्हाण, शाश्वत सेवा संस्थेच्या अध्यक्ष मिताली मातोंडकर, ओरोसचे माजी सरपंचसुहास परब, सावंतवाडी आयटीआयचे प्राचार्य रामचंद्र जाधव, सप्तरंग कलामंचचे पदाधिकारी श्रीकृष्ण कोंडसकर, वेतोबा मालिकेचे दिग्दर्शक नितीन काटकर, सिनेमोटोग्राफर गणेश कोकरे, मालिकेचे स्थानिक सेवा समन्वयक गजानन सातार्डेकर, तरुण भारत संवादच्या सोशल मीडिया प्रतिनिधी अनुजा कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर यांनी केले. यावेळी संस्थेतर्फे वेतोबा मालिकेत भूमिका करणाऱ्या वर्षा सामंत, पूजा महेंद्र, तेजश्री परब व मंगल राणे या महिला कलाकारांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या मालिकेत खलनायकाची भूमिका करणारे विवेक गोरे व निलेश गुरव यांचाही सन्मान करण्यात आला.संस्थेच्या अध्यक्षा मिताली मातोंडकर यांनी मालिकेतील सर्व कलाकार व तंत्रज्ञाना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.