अंजनवेल बौद्धवाडी येथील घटना
गुहागर/ प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील बौद्धवाडी येथे आंब्याच्या बागेमध्ये आपल्या बहिणींबरोबर आंब्याच्या फांदीला साडीचा झोपाळा बांधून त्यावर झोका घेण्यासाठी बांधलेल्या ओढणीचा गळफास लागून तेरा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
वंदना मंगेश जाधव, वय 13 मूळ राहणार रायगड जिल्ह्यातील, महाड तालुक्यातील कुंभार्डे आदिवासी वाडा, सध्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल, बौद्धवाडी असे गळफास लागून मयत झालेल्या बालिकेचे नाव आहे. या घटनेबाबत महादेव जिज्या हिलम यांनी गुहागर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. यामध्ये खबर देणार यांची मुलगी सौ. पिंकी मंगेश जाधव यांची ही मुलगी आहे. गेल्या पाच महिन्यापासून खबर देणाऱ्यां बरोबर अंजनवेल बौद्धवाडी येथे आंब्याच्या कलमाचे राखणीसाठी असलेल्या श्रीमती चांद बेबी मोहीददिन करंबेळकर यांचे बागेत झोपडी बांधून रहात आहेत. 1 मे रोजी खबर देणार हे आपल्या पत्नी समवेत सकाळी 8.30 वाजता आंबा कलमाच्या राखणे करता निघून गेले. यादरम्यान मयत वंदना जाधव ही आपल्या दोन बहिणी समवेत बागेमध्येच आंब्याच्या फांदीला साडीचा झोपाळा बांधून त्यावर झोका घेत होत्या. खेळ सुरू असताना झोका घेण्यासाठी बांधलेल्या ओढणीचा गळफास तेरा वर्षीय वंदना मंगेश जाधव हिच्या गळ्याला बसला. त्यामध्ये ती बेशुद्ध पडली. तिच्यावर उपचार करण्याकरता गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या बालिकेची तपासणी केल्यावर ती मयत झाली असल्याचे जाहीर केले. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गळफास लागून आकस्मित म्हणून नोंद झाली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.