आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य २०२३ वर्षानिमित्त प्रत्येक मंगळवारी साजरा केला जातो ‘भाकरी डे’
आळते प्रतिनिधी
आज आपली जीवनशैली खऱ्याप्रकारे आरोग्याच्या आधारावर योग्य आहे का ? आजचा आपल्या आहार, विहाराबाबत खरेतर नव्याने विचार करायची तसेच यामध्ये बदल करायची आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या लहान मुलांमध्येही फास्टफूडचे आवड वाढल्याने शहरापासून आता ग्रामीण भागातही नुडल्स, पिझ्झा, बर्गरसाठी हट्ट सुरु झाला आहे. ही पालकांसाठी आणि मुलाच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे.
पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच, त्यांचा आहारामध्ये समावेश करण्यासाठी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगांव येथे प्रभारी मुख्याध्यापिका सौ. निता घाटगे मॅडम यांच्या संकल्पनेतून मंगळवार ‘भाकरी डे’ म्हणून साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या जेवणात भाकरीचा समावेश व्हावा.म्हणून मंगळवारी जेवणाच्या डब्यात प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्वारीची ,बाजरीची भाकरी आणावी असे सांगितले.विद्यार्थ्यांनी मंगळवारी जेवणाच्या डब्यातून भाकरी आणली तसेच आवडीने भाकरी खाल्ली.शाळेतील सर्वांना ज्वारीच्या,बाजरीच्या,नाचणीच्या भाकरीचे महत्त्व सांगितले.
आरोग्यदायी ज्वारीची भाकरी खरोखरच आरोग्यदायी आहे. हे लोह, फायबर, प्रथिने आणि काही ट्रेस खनिजांनी भरलेले आहे. ज्यांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे आहे त्यांनी त्यांच्या जेवणात ज्वारीच्या भाकरीचाही समावेश करावा.भारतीय लोकांची रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली आहे हे आपण आजही सांगतो. पण, जर का पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला ही देणगी द्यायची असेल तर त्यांना आपल्या पारंपारिक खाद्य पदार्थांची माहिती आणि फायदे सांगणं अत्यंत आवश्यक आहे.
ज्वारीची भाकरी ही एकेकाळी आपल्या जेवणाचा भाग होती. पण, आता ‘भाकरी’ म्हणजे फार दिवसांनी एकदा होणारा ‘पदार्थ’ सर्वांना वाटत आहे. ज्वारी मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असल्याने ज्वारीची भाकरी खाल्ल्याने हाडं आणि शिरा मजबूत होतात. ज्वारी मध्ये असलेल्या आयर्न मुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.ज्वारीच्या भाकरीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व आहारामध्ये समावेश केल्यास तुम्हाला खूप सारे फायदे मिळू शकतील म्हणून नेहमी आपल्या आहारामध्ये भाकरीचा समावेश करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर गहू आणि इतर धान्यापेक्षा ज्वारी ही पचायला हलकी आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस तरी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश असावा.
बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.
नाचणी हे “चांगल्या” कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. त्यामुळे दररोज नाचणीची भाकरी खाल्ल्याने तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते. आणि नाचणीच्या भाकरित कॅल्शियम भरपूर असते.
हे सांगितले.यावेळी शाळेतील शिक्षक अर्चना पवार,महेश मिरजकर,वर्षा डाके ,वैशाली पाटील,कृष्णा पोळ,करिश्मा तांबोळी,ज्ञानेश्वर सावंत,कल्पना शेंडगे,अश्विनी खाडे उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळा बोरगांव मध्ये प्रत्येक मंगळवार हा ‘भाकरी डे’ आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे.
भाकरी हा पदार्थ मुलांच्या जेवणातून लुप्त होत चाललेला पदार्थ आहे . घरी हट्टीपणामुळे मुले भाकरी खात नाहीत . ‘ शाळेचा उपक्रम आहे म्हटल्यावर सर्व मुले डब्याला भाकरी घेऊन येतील व त्यातूनच त्यांना भाकरीविषयी गोडी निर्माण होईल’ ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यावर ‘भाकरी डे ‘ उपक्रम शाळेत राबवण्याचे ठरवले . त्यामुळे आता मुलांमध्ये भाकरीविषयी गोडी निर्माण होऊ लागली आहे .मुले आवडीने भाकरी खात आहेत . मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त आहे. असे शाळेच्या मुख्याध्यापिका निता घाटगे म्हणाल्या.