मागील दहा वर्षापासून कलात्मक माटोळीतून वाहतोय गणेशवंदना : केळबाय कुर्टी, फोंडा येथील विशांत गावडे
फोंडा : आपल्या गोव्यात गाव संस्कृतीत जशी अदृष्य दैवत वास करीत असल्याच्या अनेक अख्यायिका आहेत. ज्या शक्ती आपल्या गावाची कायम राखण करतात असा दृढविश्वास आजच्या डिजीटल युगातही खेडोपाड्यातील संस्कृतीशी नाळ जुडलेल्यांना आहे. त्यांनाच आपण आपल्या संस्कृतीरक्षक ‘राखणदार’ असे संबोधतो. हल्लीच कन्नड फिल्म इंडस्ट्रीतर्फे ‘कांतारा’ या चित्रपटातून आपल्या संस्कृती रक्षकाची महती सांगितलेली आहे. त्याच धर्तीवर केळबाय-कुर्टी येथील विशांत वसंत गावडे यांनी यंदा गणेश चतुर्थीनिमित्त कांतारा रूपी माटोळी सजावट करून गावातील राखणदारांचे अस्तित्व आजही अबाधित आहे, त्यांना मानसन्मान द्या संदेश दिला आहे. बहुचर्चित कांतारा या चित्रपटातून रिषभ शेट्टी यांनी निसर्गाचा राखणदाराचे चित्र उभे केले आहे. नेमका हाच संदेश सर्व गोमंतकीयापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न युवा माटोळी कलाकार विशांत गावडे यांनी केला आहे. आपले निसर्ग, आपले जंगल, आपली झाडे व आपला गावाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकामध्ये कांतारासारखी अदृष्य शक्ती वास करीत असते असे त्याचे म्हणणे आहे.
राखणदारांची पवित्र स्थळे राखून ठेवण्याचे आवाहन
निसर्ग हेच आमचे खरे दैवत आहे. निसर्गाला आपली गरज नाही तर आपल्याला निसर्गाची गरज आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. विकासाच्या नावाखाली आपण आपला निसर्ग, आपली गाव संस्कृती नष्ट व जमीन विकू लागल्यास पुढचा काळ भयानक असणार आहे. जर गावच्या राखणदाराने सदैव आपले रक्षण करावे अशी आपली अपेक्षा असेल तर आपणही एक पाऊल पुढे येऊन या गावच्या राखणदारांची पवित्र स्थळे राखून ठेवणे गरजेचे आहे.
माटोळीच्या माध्यमातून वाहतोय गणेशवंदना
आपली झाडे, आपला निसर्ग,आपला गाव, आपले गावपण राखून ठेवणे गरजेचे असल्याचे विशांत म्हणतो. चतुर्थीच्या निमित्ताने माटोळीतून वाहिलेल्या गणेशसेवेसाठी त्यीना गोव्याच्या वेगवेगळया भागात फिरून विविध फळे, औषधी गुणधर्म असलेली वनस्पती, फुले इत्यादी मिळून 315 च्या अधिक वस्तू माटोळीत समावेश केला आहे. ही सजावट करण्यासाठी प्रशांत, चंद्रेश, ओमकार, आदित्य, हर्षा, करूणा, दक्ष, केयंश यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. विशांत गावडे यानी गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्याच्या माटोळी सजावट स्पर्धेमध्ये गेली सहा वर्षे भाग घेतला असून विविध पारितोषिकेही मिळवलेली आहे. माटोळी सजावट सोमवार 25 सप्टे. पर्यत कलाप्रेमेंच्या दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.