खाणपट्ट्यातील जनतेला प्रतीक्षा : खाण कामगार, ट्रकमालक, इतर अवलंबितांची स्थिती बिकट
सांगे : दक्षिण गोव्यातील खनिज खाणी कधी लिलावाला येतील याची प्रतीक्षा खाणपट्यातील जनतेला लागली आहे. सध्या ई-लिलाव झालेला खनिजमाल आणि वाहतुकीचे काम सोडल्यास खाणींवरील अन्य व्यवहार चालू झालेले नाहीत. आजपर्यंत ज्या नऊ खनिज खाणींचा ई-लिलाव झालेला आहे त्यात केवळ मायणा-काले येथील एकमेव खाणीचा समावेश आहे. दक्षिण गोव्यातील खाण कामगार, ट्रकमालक, इतर खाण अवलंबित बेकार आहेत. त्यामुळे कधी खाणी लिलावाला येणार याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुजरात येथे हल्लीच पार पडलेल्या 26 व्या पश्चिम विभागीय परिषदेच्या वेळी आणखी पाच खनिज खाणींचे ब्लॉक्स लवकरच ई-लिलावाला येणार असल्याचे सांगितले होते. परंतु अजून नवीन ई-लिलावाची निविदा जारी झालेली नाही. यावेळी या प्रक्रियेत दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यातील खाणींचा समावेश करण्याची मागणी खाण अवलंबितांकडून होत आहे. कारण या भागातील खाण कामगार बेकार असून ट्रकांना काम नाही. अन्य खाणींवर अवलंबून असलेल्या अन्य लोकांचीही परिस्थिती बिकट झालेली आहे.
या भागातील ई-लिलावाच्या खनिजमालाची वाहतूक एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यास सुरू झाली होती. पण ट्रकांना जेमतेम काम मिळाले. यंदा ही वाहतूक 24 ऑक्टोबरला सुरू होणार, अशी चिन्हे आहेत. गोव्यातील खनिज खाणींचा पहिला ई-लिलाव 13 सप्टेंबर, 2022 रोजी चार खनिज खाणींच्या ब्लॉक्ससाठी झाला होता. यामध्ये शिरगाव-मये, डिचोली, मोनं द शिरगाव, काले खाणींचा समावेश होता. दुसरा लिलाव पाच ब्लॉक्ससाठी 17 एप्रिल. 2023 रोजी झाला. त्यात अडवलपाल-थिवी, करमळे-कुडणे, थिवी-पिर्ण, कुडणे आणि सुर्ला-सोनशी येथील खाणींचा समावेश राहिला. सुमारे पाच महिने पूर्ण होत आले, तरी अद्याप तिसऱ्या ई-लिलावाची निविदा जारी झालेली नाही. खाणपट्ट्यातील लोकांमध्ये अस्वस्थता असून लोकांना कायमस्वरूपी खाण व्यवसाय सुरू झालेला हवा आहे.