|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जगात भुकेइतकं मोठं काहीही नाही सिंधुताई सपकाळ यांचे प्रतिपादनजगात भुकेइतकं मोठं काहीही नाही सिंधुताई सपकाळ यांचे प्रतिपादन 

Pungaon photo=1

प्रतिनिधी/ राशिवडे

जगात भुकेइतकं मोठं काहीही नाही. भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते. भुकेच्या झळा मीही प्रत्यक्षात भोगलेल्या आहेत. म्हणून दारात आलेल्या भुकेल्या जिवांची विचारपूस करून त्यांच्या पोटात चार घास घालावेत कारण त्यांच्या मनात आलेले वाईट विचार बदलायला ते चार घासच कारणीभूत ठरतील. असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले.

पुंगाव (ता. राधानगरी) येथील नवोदित कवी दत्तात्रय दुरुगळे यांच्या ‘मनमौजी’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सांगलीचे उपजिल्हाधिकारी शरद काटकर होते.

आपली संस्कृती जतन करण्याची जबाबदारी महिलांची आणि तिचा आदर करणे हे पुरूषांचे कर्तव्य आहे. मात्र या कर्तव्यात कसूर न होऊ देणे हीच खरी देशसेवा ठरेल. तर आपल्या घासातील अर्धा घास भुकेल्यांच्या तोंडात घालणे हाच खरा धर्म आहे. असेही मत सपकाळ यांनी व्यक्त केले.

सपकाळ म्हणाल्या, जीवन हे जगण्यातच मजा आहे, भले काहीही होवो मात्र स्वतः आत्महत्या करण्याचे विचार कदापिही मनात येऊ देऊ नका. मी अनेक देश पाहिले पण भारतासारखा दुसरा देश नाही. इथल्या एकतेला टिकविण्याची जबाबदारीही नव्या पिढीवर आली आहे. नवकवी दत्तात्रय दुरुगळे यांच्या कविता या प्रत्येकाला आपल्या वाटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवनाथ पाटील यांनी स्वागत व राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रसिध्द बालसाहित्यिक शाम कुरळे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास राधानगरीचे पोलीस निरीक्षक अनिल गाडे, भोगावतीचे प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, बाळासो तोरस्कर, सरपंच मालुबाई बरगे, अशोकराव पाटील, विश्वासराव वरुटे-पाटील, बी. के. डोंगळे, नामदेव रेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजन रणजित बरगे, संतोष पाटील, महेश एरुडकर, अनिल किरुळकर, दिगंबर बरगे, गोपाळ शियेकर, महेश दुरुगळे, विश्वजित नारकर, प्रतिक भिवसेकर व क्रांती बॉईजसह गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रा. पवन पाटील व आनंदा शिंदे यांनी केले. उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

 

Related posts: